आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहळ्यात विविध कार्यक्रम:समर्थ नागेश्वर महाराज पुण्यतिथी, यात्रा महोत्सव सोहळ्याचे आयोजन; आज होणार हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप

संग्रामपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेले वरवट बकालचे ग्राम दैवत श्री समर्थ नागेश्वर महाराज यांची दरवर्षी ग्रामस्थ मोठ्या उत्साहात पुण्यतिथी व यात्रा महोत्सव सोहळा साजरा करतात. परंतु मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे यात्रा महोत्सव, महाप्रसाद व विविध धार्मिक कार्यक्रम खंडित पडले होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे उद्या ३ एप्रिल रोजी उडदाचे वरण व ज्वारीच्या भाकरी अशा महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. परिसरातील भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री संत नागेश्वर महाराज विश्वस्त मंडळाने केले आहे.

यावर्षी २७ मार्च ते ३ एप्रिल या दरम्यान नागेश्वर महाराज मंदिराच्या आवारात रोज पहाटे काकडा आरती, सकाळी सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ व कीर्तन, हभप गोविंद महाराज चिंचोलीकर यांचा नामसंकीर्तन सप्ताह तसेच सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायणाला प्रारंभ झाला होता. रोज सात दिवस सकाळ पासून या ज्ञानेश्वरी पारायणाला सुरवात झाल्यामुळे गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मंदिर परिसरात भाविकांसाठी अन्नदात्यांनी सकाळ, संध्याकाळ भोजनाची व्यवस्था केली होती.

तसेच या पारायणाची सांगता श्री समर्थ नागेश्वर महाराज यांच्या पुण्यतिथी दिवशी करण्यात येते. या दिवशी भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच या सप्ताहात मंदिराच्या आवारात दररोज रात्री कीर्तनाचे आयोजन संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.२७ मार्चपासून हभप शंकर महाराज, रामभाऊ महाराज ताडे,आकाश महाराज, वासुदेव महाराज, महादेव महाराज, बाजीराव महाराज, संतोष महाराज, गोपाळ महाराज यांचे किर्तन पार पडले. तर उद्या ३ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता हभप तुकाराम महाराज सखारामपूर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. भाविकांनी कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री समर्थ नागेश्वर महाराज संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...