आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राचार्य बाठे यांचे प्रतिपादन:संस्कार हे चांगले-वाईट यामधील योग्य काय याची जाणीव करून देतात; कला महाविद्यालयाच्या श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन

बुलडाणा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रम करण्याची तयारी आणि माणसावर झालेले संस्कार हे दोन मूल्ये ज्याच्या जवळ आहे, तो माणूस आयुष्यात कुठेच मागे राहू शकत नाही. कारण श्रम हे यशाचा मार्ग दाखवितात तर संस्कार हे चांगलं आणि वाईट यामधील योग्य काय आहे, याची जाणीव करून देत असतात, त्यामुळे श्रम आणि चांगले संस्कार माणसाने अंगीकारूनच यश संपादन करावे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुरेश बाठे यांनी केले.

दत्तक ग्राम येळगाव येथे ३० मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत सुरू असलेल्या श्रम संस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी विचार मंचावर श्री संत गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष उत्तमराव काकडे उद्घाटक म्हणून तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य शिवहरी वाघ, प्रगती अध्यापक विद्यालयाच्या रासेयो क्षेत्रीय समन्वयक प्रा. डॉ. माधुरी देशमुख, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. डॉ.विलास टाले यांनी शिबिर आयोजना मागचा उद्देश, शिबिरादरम्यान राबवण्यात येणाऱ्या श्रमदान आणि विविध बौध्दिक कार्यक्रमाची माहिती उपस्थित सर्व शिबिरार्थींना दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना श्रमाचा परिचय असतो. परंतु संस्कार घडवण्याचे हे त्यांचे वय असते.

त्यामुळे अशा शिबिरांमधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी चांगले संस्कार आत्मसात केले पाहिजे, असे विचार उद्घाटक उत्तमराव काकडे यांनी व्यक्त केले. शिबिरामध्ये सहभागी झालेले सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी या ग्रामीण भागातील आहे. त्यामुळे अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपले आई वडील आपल्यासाठी काय कष्ट करतात याची जाणीव ठेवली पाहिजे. तसेच अशा श्रम संस्कार शिबिरांमध्ये सहभागी होऊन कुटुंबाचे आणि समाजाचे ऋण फेडले पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य शिवहरी वाघ यांनी उपस्थित सर्व शिबिरार्थींना केले.

याप्रसंगी प्रा. डॉ. माधुरी देशमुख यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शिबिरार्थींना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. आरती खडतकर यांनी तर आभार प्रदर्शन वरिष्ठ लिपिक गजानन होणे यांनी केले. शिबिराला प्रा.डॉ.सिद्धेश्वर नवलाखे, प्रा. डॉ. नंदकिशोर अरुळकर, अजय रिंढे, सिद्धार्थ जमदाडे यांच्यासह पन्नास रासेयो शिबिरार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...