आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यासह परराज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी येथे रविवार, १२ मार्चला हाजी अब्दुल रहेमान उर्फ सैलानी बाबा यांचा संदल काढण्यात येणार आहे. या संदलसाठी लाखो भाविक मिळेल त्या वाहनाने सैलानीत डेरेदाखल होत आहेत. देशभरातील सर्वधर्मीय लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पिंपळगाव सराई येथील सैलानी बाबाच्या यात्रेला खऱ्या अर्थाने होळीपासून सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे मागील तीन वर्षांपासून यात्रेला खंड पडला होता.
परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे यंदा मोठ्या उत्साहात ही यात्रा भरणार असल्याचे दिसून येत आहे. यात्रेसाठी भाविक मिळेल त्या वाहनाने सैलानीत येत आहेत. हजारो भाविक काही दिवसांपासून सैलानीत डेरेदाखल झाले आहेत.
अंजिठा डोंंगरकुशीत वसलेल्या पिंपळगाव सराई येथे हाजी अब्दुल रहेमान उर्फ सैलानी बाबा यांची दर्गा आहे. सैलानी बाबाचे मनोभावे दर्शन घेण्यासाठी होळी व संदलच्या दिवशी लाखो भाविक या ठिकाणी येतात. यात्रेत भाविकांना येण्यासाठी परिवहन महामंडळाच्या अकोला, औरंगाबाद, जालना, नांदेड, बुलडाणा, चिखली यासह इतर आगारातून मोठ्या प्रमाणात बसेस यात्रेसाठी सोडण्यात येत आहेत. १२ मार्चला रात्री ८ वाजता पिंपळगाव येथून बाबाचा संदल काढण्यात येणार आहे. रात्री दरम्यान सैलानी बाबाच्या दर्ग्यावर चादर चढवली जाणार आहे. त्यानंतर संदलची सांगता करण्यात येणार आहे. या संदलसाठी पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सुरक्षेसाठी ८० ठिकाणी ठेवला पोलिस बंदोबस्त
भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाने यात्रेदरम्यान ८० ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. याद्वारे अनुचित प्रकारावर नजर ठेवली जाणार आहे. काही अनुचित प्रकार घडल्यास भाविकांनी आपल्या जवळच्या बंदोबस्त ठिकाणी संपर्क साधावा. - राजवंत आठवले, ठाणेदार, रायपूर.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.