आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवालदिल:योजना सक्षम, तरीही पाण्यासाठी संजयनगर भागात महिलांची भटकंती ; पाणी टंचाईचा सामना

देऊळगावराजा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील नागरिकांसाठी संत चोखा सागर खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी पुरवठा योजना सक्षम असूनही केवळ नियोजनाचा अभाव असल्याने उन्हाळ्याच्या अखेरीस पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याचा फटका शहरातील मुस्लिम बहुल असलेल्या संजय नगर व पिंपळनेर भागातील महिलांना बसत आहे. त्यामुळे या परिसरातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वर्षानुवर्षे कुटुंबासाठी पाण्याची सोय करणाऱ्या या महिलांच्या डोक्यावरील घागर कधी उतरणार असा प्रश्न स्थानिक रहिवासी न.प. प्रशासन व लोकप्रतिनिधींना विचारत आहेत. ऋतू कोणताही असो नगर पालिका प्रशासनाकडून देऊळगावराजा शहरातील नागरिकांना पंधरा दिवसा नंतरच पाणीपुरवठा केला जातो. शहरवासीयांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी तत्कालीन आमदार तथा विद्यमान पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. दरम्यान संत चोखा सागर खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी पुरवठा योजना आठ वर्षापूर्वी पूर्णत्वास गेली. मात्र शहरातील अंतर्गत पाइप लाइन शंभर वर्षापूर्वीची असल्याने विस्तारित झालेल्या शहराच्या दृष्टीने ही जलवाहिनी कालबाह्य ठरत आहे. त्यातच नगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या उदासीन कार्यपद्धती आणि नियोजनाचा अभाव असल्यामुळे नागरिकांना मुबलक प्रमाणात सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. किमान सहाव्या दिवशी पाणीपुरवठा व्हावा अशी शहरवासीयांची मागणी असताना तब्बल १५ ते २० दिवसांनंतर पालिकेमार्फत पाणीपुरवठा केला जात असल्याने शहरातील नागरिकांना पाणीटंचाई ही पाचवीला पुजलेली आहे. शहरातील मध्य भागातील मध्यमवर्गीय कुटुंबाजवळ पाणी साठवून ठेवण्यासाठी पर्याय उपलब्ध आहे. मात्र, गजबजलेली नागरी वस्ती असलेला संजय नगर व पिंपळनेर भागात आर्थिक दृष्ट्या कमकुवत कुटुंब राहत असल्याने पाणी साठवण्याची क्षमता त्यांच्याकडे उपलब्ध नाही. परिणामी महिलांना व शाळकरी विद्यार्थ्यांना दररोज डोक्यावर घागर घेऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागते. नगरपालिका प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन पाणीपुरवठा विभागाला अलर्ट करण्याची गरज निर्माण झाली आहे. रस्ता ओलांडताना होऊ शकतो अपघात संजय नगर भागात नगर पालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र असून या ठिकाणी महिला व मुले पाणी भरण्यासाठी येतात. येथूनच जालना-जाफ्राबाद मार्ग गेल्याने रस्ता ओलांडून महिलांना जावे लागते. अनेकवेळा वाहन भरधाव वेगाने जात असून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.याबरोबरच पाणी वितरणा संदर्भात योग्य आणि नियोजनबद्ध आखणी केल्यास पाणीपुरवठ्याचे दिवस कमी होऊन त्यांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळेल.

आठव्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न ^संजय नगर परिसरातील सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी नव्याने पाइपलाइन व पंप बसवला असून या पाइपलाइनची टेस्टिंग झाली आहे. येत्या आठवड्यात कार्यान्वित होणार आहे. या नवीन पंप व जलवाहिनीमुळे संजय नगर भागात आठव्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न राहील. तसेच शहरातील पाणीपुरवठ्याचे दिवस चार ते पाच दिवसाने कमी होईल. -अरुण मोकळ,मुख्याधिकारी नगरपरिषद, देऊळगावराजा

लवकरच ३१.५६ कोटींच्या योजनेला मंजुरी ^शहरातील अंतर्गत पाइपलाइन ज़ुनी झाली असून नवीन विस्तारित शहराच्या दृष्टीने सदर अंतर्गत जलवाहिनी सिस्टिम आता कालबाह्य झाली आहे. शहराला कमीत कमी दिवसात पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे अंतर्गत पाइपलाइनसाठी राज्य शासनाकडून निधी प्राप्त करण्यासाठी पाठपुरावा करीत आहे. लवकरच ३१.५६ कोटीच्या योजनेला मंजुरी मिळेल. -संतोष खांडेभराड, माजी नगराध्यक्ष

बातम्या आणखी आहेत...