आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघरात घुसून तोडफोड व मारहाण करून विवाहित महिला व तिच्या भावाचे अपहरण केल्याची घटना शहरातील अशोक नगर परिसरात गुरुवारी रात्री घडली होती. प्रकरणी शहर पोलिसांनी आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर शहर पोलिसांनी तपास चक्र फिरवत अवघ्या दोन दिवसांत सात आरोपींना अटक केली. दरम्यान, शनिवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अशोक नगरातील गजानन ठोसर याने बँकेत नोकरी लावून देतो, असे म्हणून घेतलेली रक्कम परत घेण्यासाठी काही लोक वारंवार त्याच्या घरी आले.
परंतु त्यांना पैसे न मिळाल्याने त्यांनी आक्रमक भूमिका घेत गजानन ठोसर यांच्या घरी पोहोचले. यावेळी त्यांनी घरातील साहित्याची तोडफोड करून घरच्या लोकांना मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी गजानन ठोसर यांची पत्नी रूपाली गजानन ठोसर व त्यांचा भाऊ शिवम श्रीनाथ अशा दोघांनाही जबरीने सोबत घेऊन गेले.
या घटनेची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने एकच खळबळ उडाली होती. प्रकरणी अपहरण झालेल्या विवाहित महिलेची बहिण वैशाली रवी रत्नपारखी यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध संगनमताने घरात घुसून तोडफोड व मारहाण त्याचबरोबर अपहरणाचा गुन्हा दाखल केला. प्रकरणी पोलिसांनी काल शुक्रवारी रामावतार रघुनाथ लोधी, शिवलनगर भुसावळ व मुन्ना विरसींह जमरे रा.हेलपाडावा चौपाले जि.खरगोन या दोघांना अटक केली.
सध्या दोघेही पोलिस कोठडीत आहेत. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली गेलेल्या पथकाने आज शनिवार रोजी उमेश हरीभाऊ ठाकरे वय २९ वर्ष, रा. मसुला ता.मंगरुळपिर जि.वाशिम, राहुल उत्तम माने वय २६ वर्ष, रा.खानापुर जि. सांगली, हर्षवर्धन संभाजी चव्हाण वय २९, रा.येडराव ता.शिरोळ, जि. कोल्हापुर, रेवलसिंग भावसिंग मंडलोई वय २८, रा.हेला पडावा ता.झिरनिया जि.खरगोण म.प्र, रंजना हेमनारायण लोधी वय ३९, रा.शिवदत्त नगर भुसावळ, या पाच आरोपींना अटक केली. मागील दोन दिवसात पोलिसांनी अपहरण प्रकरणातील एकुण सात आरोपींना अटक करून जेरबंद केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.