आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांती उत्सव:कोजागरी पौर्णिमेपासून मोठ्या देवीचा शांती उत्सव

खामगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केवळ खामगावात साजरा होणाऱ्या श्री जगदंबा देवीचा शांती उत्सवाला कोजागरी पौर्णिमेपासून प्रारंभ होत आहे. श्री जगदंबा सार्वजनिक उत्सव मंडळ (मोठी देवी) तर्फे जगदंबा देवीची ९ ऑक्टोबर रोजी विधिवत पूजाअर्चा करुन सायंकाळी सात वाजता स्थापना करण्यात येणार आहे. या उत्सवासाठी शहरातील विविध मंडळांतर्फे मंडप, विद्युत रोषणाई करण्यात येत आहे.

जगदंबा चौकातील जगदंबा सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे बसविण्यात येणारी देवी मोठी देवी म्हणून सर्वदूर ओळखली जाते. या देवीला १ १४ वर्षाची परंपरा लाभली असून १९०८ साली केरतन्ना परशुराम आनंदे यांनी कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी देवीची स्थापना केली होती. कोरोनाचे दोन वर्ष वगळता तेव्हापासून आजपर्यंत हा उत्सव शहरामध्ये मोठया भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे. यंदा ९ ऑक्टोबर रोजी देवीची विधिवत पूजा करत स्थापना करुन देवी समोरील पडदा सायंकाळी ७ च्या सुमारास उघडण्यात येणार आहे. यंदा देवीचा हा उत्सव १२ दिवस भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे.

सकाळी सात व रात्री नऊ या दरम्यान देवीची आरती हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. १७ ऑक्टोबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तर महाप्रसादाची वेळ सकाळी अकरा ते दुपारी सहा अशी राहणार आहे. १९ ऑक्टोबर रोजी सत्यनारायणाची पुजा करण्यात येणार आहे. तर २० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता देवीची विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. देवीचे विसर्जन जनुना तलावात करण्यात येणार आहे. विजयादशमीला असुरांचा संहार करुन जेव्हा देवी परत येते तेव्हा ती क्रोधित असल्याने तिचा चेहरा लाल झालेला असतो.

म्हणून या देवीचा चेहरा लाल रंगाचा करण्यात येतो व तिला शांत करण्यासाठी पूजा, अर्चना, आराधना, आरती व जयजयकार करुन मातेस शांत करण्याकरता हा उत्सव साजरा केला जातो. म्हणून या उत्सवाला शांती उत्सव म्हटले जाते. नवसाला पावणारी ही मोठी देवी म्हणून ओळखली जाते. जगदंबा उत्सवाच्या १२ दिवसाच्या कालावधीत राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून भाविक भक्त येथे दर्शनासाठी येत असतात. देवीच्या भव्यदिव्य मंडपाभोवती व परिसरात विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

देवीचा दरबार दर्शनासाठी खुला
जगदंबा चौकात ओटी, साड्या, प्रसाद, नारळ, हार आदींची दुकाने थाटण्यात येत आहेत. या उत्सवाच्या काळात जगदंबा देवीचा दरबार २४ तास भक्तांना दर्शनासाठी खुला ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री जगदंबा सार्वजनिक उत्सव मंडळाचे उत्तम उमरकर यांनी दिली. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी श्री जगदंबा सार्वजनिक उत्सव मंडळाचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...