आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खदखद:शिवसेना आणि शिंदे गटात पहिल्यांदाच वादाची ठिणगी ; शिंदे गटाकडून खुर्च्यांची तोडफोड

बुलडाणा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना आमची असे शिंदे व ठाकरे गट सांगत असतानाच बुलडाणा शहरात ठाकरे गटाने मेळावा घेतला होता. त्याच वेळी शिंदे गटाचे आ. संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी त्या सभेत येऊन आढावा घेतला होता. त्यावेळच्या ठिणगीने शनिवारी ठाकरे गटाच्या सत्कार सोहळ्यात राड्याच्या रूपाने पेट घेतला. आता ही ठिणगी अशीच पेटती राहण्याची विधाने दोन्ही बाजूने झाली आहेत.

उद्धव ठाकरे गटाच्या वतीने बाजार समितीच्या शेतकरी भवन या सभागृहात शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार आयोजित केला होता. या वेळी जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, छगन मेहेत्रे, आशिष रहाटे व सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष उपस्थित होते. या वेळी घोषणाबाजी करत शिंदे गट आत शिरला व त्यांनी खुर्च्यांची तोडफोड केली. दरम्यान विधान सभा संपर्क प्रमुख संजय हाडे यांना पोटात लाथ मारली. आम्हीच खरे शिवसैनिक अशा घोषणाही शिंदे गटाने दिल्या. या वेळी आ. संजय गायकवाड समर्थक व त्यांचे पुत्र कुणाल गायकवाड हे सुद्धा येथे असल्याचे शिंदे गटाकडून सांगितल्या जाते. ही घटना घडत असताना पोलिस मात्र काही वेळ बघ्याची भूमिका घेत होते.

अर्वाच्य भाषा वापरल्याने संतप्त
बाजार समिती ही शेतकऱ्यांची आहे. येथे राजकीय कार्यक्रम घेताना आमच्या कार्यकर्त्यांना फोन आले होते. त्यामुळे ते तेथे काय बोलतात हे ऐकण्यासाठी गेले होते. जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. प्रतापराव जाधव व आमदारांविरुद्ध अपशब्द बोलले जातात.या कार्यक्रमातही अपशब्द निघाल्याने कार्यकर्ते संतप्त झाले. हा कार्यक्रम लाइव्ह बघत होतो. तुम्हाला पक्ष बांधायचा तो बांधा पण शिव्या देऊ नका, अर्वाच्य भाषा वापरली, तर आम्ही गप्प राहणार नाही.
- आ. संजय गायकवाड, बुलडाणा.

पोलिस काय कारवाई करणार याकडे लक्ष
उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यात नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम बाजार समितीच्या सभागृहात सुरू होता. या वेळी लक्ष्मण वडेले यांचे भाषण सुरू असतानाच शिंदे गटाच्या लोकांनी हैदोस घातला. आम्ही शांतता बाळगली. आम्ही दडपशाहीला घाबरणारे नाही. शिवसेना कितीही थांबवण्याचे प्रयत्न केले, तरी ती थांबणार नाही. आजच्या घटनेवर पोलिस येत्या काही दिवसांत काय कारवाई करतात. याकडे लक्ष लागले, अन्यथा जिल्हा बंद करू.
- जालिंदर बुधवत, जिल्हाप्रमुख, शिवसेना.

शिंदे गटाकडून अद्याप तक्रार नाही
बाजार समिती सभागृहात सुरू असलेला ठाकरे गटाच्या नवनियुक्तांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावला. चार खुर्च्या तोडल्या. आरडाओरड केली. पोलिसांनी हस्तक्षेप करत श्याम पवार, राज धुरणे, गजानन बाळासाहेब कोरके, गणेश गायकवाड या कार्यकर्त्यांना अटक केली. आयोजकांना पोलिस ठाण्यात येण्यास सांगितले होते, ते आले नाहीत. त्यांनी तक्रार दिली नाही. त्यामुळे पोलिसांनीच चौघांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली.
- प्रल्हाद काटकर, ठाणेदार, बुलडाणा.

बातम्या आणखी आहेत...