आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असंतोष:शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेनेचे आंदोलन

लोणार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवसाचे भारनियमन बंद करून शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी लोणार तालुका शिवसेनेच्या वतीने आज ५ डिसेंबर रोजी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे. शिवसेना तालुका प्रमुख संदीप मापारी यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यासाठी शासनाकडून जनजागृती करण्यात येते. मात्र या पिक विम्याच्या रकमेपोटी शेतकरी भरत असलेल्या हप्त्याच्या तुलनेत ५० ते १०० रुपये तर अनेक ठिकाणी त्याहीपेक्षा कमी मोबदला देण्यात आला आहे. ही एक प्रकारे शेतकऱ्यांची थट्टा आहे.

महत्वाचे म्हणजे पिक विम्याच्या हप्त्यापोटी शासनही त्यात भर घालते. परंतु जेव्हा मोबदला देण्याची वेळ येते, तेव्हा शेतकऱ्यांना योग्य रक्कम मिळत नाही. त्यामुळे विमा कंपन्यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे दिसून येत आहे. शासन व केंद्र शासन शेतकऱ्यांची कैफियत ऐकायला तयार नाही. त्यामुळे न्याय कोणाकडे मागावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

हेळसांड थांबवण्यासाठी शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यात यावी, तसेच रब्बी हंगामासाठी दिवसा आठ तास वीज पुरवठा करण्यात यावा, तसेच नादुरुस्त रोहित्र तत्काळ बदलून देण्यात यावे, अन्यथा शिवसेना लोणार तालुक्याच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गणेश सातपुते, लुकमान कुरेशी, इम्रान कुरेशी, तुकाराम राठोड, असलमखान, समाधान मापारी, शाम राऊत, सुधन अंभोरे, कैलास अंभोरे, विनोद मापारी, सुभाष मापारी, संजीवनी वाघ, काशीनाथ वाघ, अर्चना मुंढे व लक्ष्मी कुहिटे यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...