आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धांजली:शिवस्मारक प्रणेत्याच्या स्मृती बुलडाण्यात जपणार ; स्व. विनायकराव मेटे यांच्या आठवणी

बुलडाणा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनायकराव मेटे व बुलडाणा जिल्हा हे भावनिक ऋणानुबंध होते. मराठा आरक्षणासाठीचा एल्गार त्यांनी शेगाव येथून पुकारला होता. मराठा महासंघाचे नेते स्व. अण्णासाहेब पाटील येरळीकर त्यांचे मार्गदर्शक होते. जगातील सर्वात भव्यदिव्य शिवस्मारक मुंबईच्या अरबी समुद्रात व्हावे, या संकल्पनेचे ते प्रणेते होते. त्यामुळे या शिवस्मारकाच्या प्रणेत्याच्या स्मृती बुलडाणा शहरात साकार होत असलेल्या भव्य शिवस्मारकात जपण्यात येतील, असे अभिवचन सर्वपक्षीय व सर्व संघटनांनी संयुक्तपणे वाहिलेल्या श्रद्धांजली सभेत दिले.

स्व. विनायकराव मेटे यांचे अपघाती निधन झाल्यानंतर जिल्ह्यात विविध स्तरातून शोक व्यक्त करण्यात आला. शुक्रवारी शिवस्मारक समिती बुलडाण्याच्या वतीने स्व. मेटे यांना सामुहिक श्रद्धांजली सभेचे आयोजन एका हॉटेलच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी बोलतांना माजी मंत्री आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी विनायकरावांबद्दलच्या स्मृती जागवताना त्यांच्याशी असलेले कौटुंबिक ऋणानुबंधाच्या आठवणींना उजाळा दिला. राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्याशी विनायकरावांची ते कुठल्याही पक्षात असले तरी कायम जवळीक राहिली असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी आ. संजय गायकवाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, माजी आमदार विजयराज शिंदे, ज्येष्ठ नेते गोकुल शर्मा, शिवराय प्रतिष्ठान मलकापूरचे अध्यक्ष साहेबराव मोरे व शिवस्मारक समिती बुलडाण्याचे सचिव डॉ. विकास बाहेकर यांनी स्व. मेटे यांच्या संघर्षाच्या काळातील आठवणींना उजाळा दिला. आयुष्यभर मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या विनायकराव मेटे यांना शिंदे व फडणवीस सरकारने मराठा आरक्षण मिळवून देणे, हीच खरी श्रद्धांजली ठरेल अशा शोकसंवेदना दूरध्वनीद्वारे श्रध्दांजलीपर मनोगत व्यक्त करताना आ. श्वेता महाले यांनी व्यक्त केल्या. तसेच बुलडाणा बार असो. अध्यक्ष अ‍ॅड. विजय सावळे, मराठा महासंघाच्या विभागीय अध्यक्षा अनुजा सावळे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, मराठा सेवा संघाचे डॉ. तेजराव तुपकर, होमिओपॅथी संघटनेचे डॉ. दुर्गासिंग जाधव, बलदेवराव चोपडे, राकॉ. चे डी. एस. लहाने, राजर्षी शाहू पतसंस्थेचे अध्यक्ष संदिप शेळके, अरुण जैन आदींनीही श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, मराठा सेवा संघाचे संजय विखे, अ‍ॅड.जयसिंग देशमुख, सुनील सपकाळ, कुणाल गायकवाड, ओमसिंग राजपूत, राजेश हेलगे, मानकर, प्रा.म्हळसणे, गोपालसिंग राजपूत, नंदकिशोर पाटील, महादेव शेळके, नरेश शेळके, अरविंद होंडे, अनिल बावस्कर, पद्मनाभ बाहेकर ओमसिंग राजपूत, सचिन परांडे यांच्यासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते.आयोजनात तुकाराम अंभोरे पाटील व शिवस्मारक समिती बुलडाण्याच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. शेवटी सामूहिक श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...