आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एलसीबी’ची कारवाई:भाजीपाल्याच्या 300 रिकाम्या क्रेट खाली 53 लाखांच्या 435 किलो गांजाची तस्करी

अमरावती24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओडिशातून आंध प्रदेश व आंध्र प्रदेशातून चांदूर रेल्वे मार्गे अमरावती शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक करणारा एक ट्रक स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि. २) उशिरा रात्री पकडला. यावेळी भाजीपाला वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या सुमारे ३०० ते ३५० रिकाम्या क्रेटखाली गांजा तस्करांनी गांजा लपवला होता. पोलिसांनी क्रेट खालून ४३५ किलो गांजा (५२ लाख २० हजार ६०० रुपये किंमत) जप्त केला. याचवेळी गांजा घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या सुरक्षेसाठी असलेल्या दोन कारसुद्धा पकडल्या असून, चौघांना अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गांजासह ७४ लाख २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ऋषभ मोहन पोहोकार (२५, रा. रिद्धपूर, ता. मोर्शी), विक्की बस्तीलाल युवनाते (२०, रा. शिरजगाव कसबा, ता. चांदूर बाजार), शेख अरबाज शेख इलियास, (१९, आझाद नगर, अमरावती) आणि शेख तौसिफ शेख लतीफ (१९, रा. रतनगंज, खुर्शीदपुरा, अमरावती) या चौघांना अटक केली आहे. ऋषभ पोहनकर चालक असलेल्या एका ट्रकमध्ये सुमारे ३०० ते ३५० क्रेट भरलेले होते. त्यामुळे दूरवरुन ट्रकमध्ये क्रेट असावेत, असेच दिसत होते. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तपन काेल्हे व त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती असल्यामुळे पथकाने चांदूर रेल्वे जवळ नाकाबंदी केली. त्याचदरम्यान एक कार पोलिसांना दिसली. पोलिसांनी ती कार पकडली, त्या पाठोपाठ ट्रक आला, या ट्रकमध्ये गांजा होता. क्रेट खाली प्रत्येकी ४ ते ५ किलो गांजा असलेले ठोकळ्याच्या आकाराचे गांजाचे पॅकेट तयार करुन त्याला खाकी टिस्कोटेप गुंडाळला होता. पोलिसांनी हा संपूर्ण गांजा जप्त करुन ट्रकचालक, वाहकाला ताब्यात घेतले. याचवेळी गांजा वाहतुकीदरम्यान माहिती देण्यासाठी ट्रकच्या समोर व मागे प्रत्येकी एका कारद्वारे सुरक्षा दिली होती. या दोन्ही कारसह कारमधील दोघांना अटक केली आहे. ट्रकमध्ये आणलेला गांजा अमरावती शहर व ग्रामीण भागासाठी नेरपिंगळाई येथे जात होता, अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली.

ही कारवाई एसपी अविनाश बारगळ, एएसपी शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पीआय तपन कोल्हे, पीएसआय नितीन चुलपार, पीएसआय मूलचंद भांबुरकर, संतोष मुंदाणे, रवींद्र बावणे, बळवंत दाभने, पंकज फाटे, दिनेश कनोजिया, मोहन मोरे, अमोल देशमुख, विलास रोकडे, नीलेश डांगोरे, नितीन कळमकर, प्रमोद शिरसाठ यांनी केली आहे.

२० महिन्यांत १ कोटी ७१ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त जिल्ह्यात ग्रामीण पोलिसांनी जानेवारी ते डिसेंबर २०२१ या वर्षभरात गांजाच्या २२ कारवाई केल्या आहेत. या २२ कारवाईमधून गांजासह ६९ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला होता. तसेच १ जानेवारी ते २ सप्टेंबर २०२२ पर्यंत ६ कारवाई केल्या आहेत. त्यामध्ये १ कोटी १६ लाख ४ हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. मागील २० महिन्यात एकूण २८ कारवाईमधून सुमारे १ कोटी ७१ लाख ४७ हजार ६०० रुपयांचा गांजा व ऐवज जप्त केला आहे. मात्र, शुक्रवारी रात्री उशीरा झालेल्या एकाच कारवाईत ‘एलसीब“ने ७४ लाख २० हजारांचा गांजा व मुद्देमाल जप्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...