आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा अधिक राहणार आहे. जवळपास तीन लाख ८३ हजार हेक्टरवर हा पेरा होण्याचा अंदाज आहे. त्यापाठोपाठ कापूस दोन लाख १० हजार हेक्टरवर पेरा होणार आहे. यंदाच्या खरीप हंगामकरिता खामगाव तालुक्यातील ग्रामीण, शहरी भागात असलेल्या एकूण १४४ कृषी केंद्रावर उपलब्ध बियाण्यांपैकी सोयाबीनच्या बियाण्यांची ४५ टक्के, तर कपाशीच्या बियाण्यांची ३० ते ३५ टक्के विक्री झाली आहे. यावरून यंदा शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे असल्याचे दिसून येत आहे. पेरणीच्या वेळी लागणारे खत सुद्धा शेतकऱ्यांनी विकत घेतले आहे. तर दुसरीकडे अनेकजण बी-बियाणे व खतांच्या खरेदीसाठी जुळवाजुळव करत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. या वेळी ९ जून रोजी मृग नक्षत्रातील पहिला पाऊस पडला असला तरी पेरणीसाठी लागणाऱ्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना करावी लागत आहे. गतवर्षी २०२१ च्या खरीप हंगामात मृग नक्षत्र लागण्याआधी अवकाळी पाऊस पडला होता. त्यानंतरही पडलेला पाऊस हा पेरणीयोग्य झाल्यामुळे १० जून २०२१ पर्यंत तालुक्यातील १५ ते २० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तालुक्यात १०० टक्के पेरण्या झाल्या होत्या. यंदा ८ जून २०२२ रोजी मृग नक्षत्र लागले. त्यामुळे पहिला पाऊस केव्हा बरसतो याची शेतकऱ्यांसह नागरिकांना प्रतीक्षा लागली होती. अखेर ९ जूनला रात्रीच्या सुमारास पाऊस झाला. १० जूनच्या सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत १२.४ मिमी. पाऊस पडला आहे. त्यामुळे शहरवासीयांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. खामगाव तालुक्यात सोयाबीन २७ हजार २३२ क्विंटल, कापूस ३८५ क्विंटल, तूर १ हजार ३५१ क्विंटल, उडीद ४४७ क्विंटल, मूग ३६० क्विंटल, मका २० क्विंटल, ज्वारी ३५ क्विंटल असे एकूण ३० हजार ५३१ क्विंटल बियाणे या बरोबरच युरिया, डीएपी, एमओपी खतांसह वेगवेगळ्या प्रकारची व वेगवेगळ्या कंपनीची ६ हजार ६९८ टन खते बाजारात उपलब्ध असल्याची माहिती खामगाव पं. स. चे कृषी अधिकारी व्ही. डी. राऊत यांनी दिली. बियाण्यांचा व खतांचा काळा बाजार रोखण्यासाठी तालुकास्तरावर पथक तयार करण्यात आले आहे. या पथकात उपविभागीय अधिकारी कृषी, तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी यांचा समावेश आहे. तालुक्यातील कृषी केंद्राची एकूण संख्या १४४ आहे. यापैकी शहरी भागात ५७ केंद्र आहेत. यात ५२ कृषी केंद्र कार्यरत आहे तर ५ कृषी केंद्र बंद आहे. ग्रामीण भागातील १०४ केंद्र असून १२ कृषी केंद्र बंद आहेत. सोयाबीन बियाण्यांच्या किमतीमध्ये यंदा वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी घरचे सोयाबीन पेरण्याचे ठरवले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांजवळ ३६ हजार ९०७ क्विंटल बियाणे पेरणीसाठी घरीच ठेवले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
मका ३ हजार ९१९ क्विंटल, तूर ४३४२ क्विंटल, मूग ८१३ क्विंटल, कापूस पाकिटे १० लाख ४७५०, सोयाबीन महाबीज १९ हजार क्विंटल, खासगी कंपन्यांची ४४ हजार ३३० क्विंटल असून यासोबतच शेतकऱ्यांनी राखून ठेवलेले बियाणे ४ लाख २७ हजार ४४० क्विंटल बियाणे उपलब्ध आहे.
असे आहे जिल्ह्यातील खरिपाचे नियोजन जिल्ह्यात खरिपाच्या नियोजनात सोयाबीन ३ लाख ८३ हजार हेक्टर, कापूस २ लाख १० हजार हे., तूर ७६ हजार हे., उडीद २० हजार हे., मका २८ हजार, ज्वारी ८८०० हे. व मूग १६ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन आहे. अशाप्रकारे एकूण खरीप हंगामात जिल्ह्यात ७ लाख ३४ हजार ७०० हेक्टर लागवडीचे नियोजन आहे. जिल्ह्यासाठी १ लाख ७७५६२ मेट्रिक टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.