आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:21 तास रंगला श्री बालाजींचा पालखी सोहळा

देऊळगावराजा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​​​तिरुपतीचे प्रतिरूप असलेल्या श्री बालाजी महाराजांच्या पालखी सोहळ्यात कोरोना काळानंतर यावर्षी भाविकांची मांदियाळी पाहावयास मिळाली. मध्यरात्रीनंतर पालखीत विराजमान झालेले श्री बालाजी सीमोल्लंघनासाठी निघाले. जवळपास एकवीस तास हा पालखी सोहळा रंगला होता. यावेळी ५२ थांब्यांवर श्रींच्या मूर्तीला स्पर्श करीत लाखो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

३३० वर्षांची परंपरा लाभलेल्या या सोहळ्यात श्रींची मूर्ती विराजमान झालेली पालखी मध्यरात्रीनंतर लक्ष्मीरमण गोविंदा व श्री बालाजी महाराज की जयजयकार करीत मंदिराबाहेर निघाली. तत्पूर्वी पुजारी व भाविकांच्या उपस्थितीत श्री बालाजी संस्थानचे विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांनी सपत्नीक श्रींची महाआरती केली.

घटउत्थापन, यजमानांचा व मानाचा अभिषेक, वंश पारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांचा प्रथेनुसार पुजारी यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार, शस्त्र पूजन, आशीर्वाद विधी असे सर्व विधी करण्यात आले. श्री बालाजी महाराज पालखी दिंडी समिती श्री बालाजी संस्थेच्या आवाहनानंतर पंचक्रोशीतील २५ वारकरी दिंड्यांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. भजनाच्या गजरात बालाजी नगरी दुमदुमून गेली होती. सोबतच या पालखी सोहळ्यात ढोल पथक, बॅन्ड पथक सहभागी झाले होते. श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे पावली पथक या पालखीचे खास आकर्षण ठरले. पालखी उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी ब्राह्मणवृंद, पट्टेधारी, सेवेकरी, मानकरी, श्री बालाजी संस्थान, पोलिस प्रशासन, श्री व्यंकटेश महाविद्यालय यांच्यासह भाविक भक्तांनी परिश्रम घेतले. लाखो भाविकांनी पालखीमध्ये श्री बालाजी महाराज यांच्या मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेतले.

बातम्या आणखी आहेत...