आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगडफेक:एसटी बसवर दोघांची दगडफेक; 20 हजारांचे नुकसान

बुलडाणा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहानुभूती ते तीव्र नाराजी असे वळण धारण केलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता दगडफेकीवर उतरल्याचे चित्र बुलडाणा शहरात १ एप्रिल रोजी दुपारी दीडच्या सुमारास दिसून आले. गंगाखेड ते बुलडाणा ही बस चिखली कडून बुलडाण्यात येत असता हॉटेल शाम समोर दुचाकीवर आलेल्या दोघांनी या बसवर दगडफेक केली. या घटनेत बसच्या काचा फुटून २० हजार रुपयांचे नुकसान झाले. प्रकरणी बसचालक माधव घरजाळे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील रहिवासी माधव घरजाळे हे गंगाखेड आगाराचे बस चालक आहेत.

ते काल सकाळी सात वाजता एम एच २० /बीएल /३०९६ या क्रमांकाची बस घेऊन वाहक राजेश कानडे यांच्यासह गंगाखेडवरून निघाले होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास ते बुलडाण्याकडे येत होते. चिखली रोड वरील श्याम हॉटेल समोर बस आली असता पल्सर दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी चालू गाडी वरूनच तू कशाला बस काढली, असे जोरात बोलू लागले. एवढ्यात दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीने बसच्या समोरील काचेवर दगड मारला. त्यामुळे बसच्या काचेला तडा गेला. ही घटना लक्षात येताच चालकाने बस जागीच थांबवली. त्याचवेळी दुचाकीस्वार चिखली कडे पळून गेले. यावेळी दोघांच्याही तोंडाला रुमाल बांधलेला होता.

गाडी चालवणाऱ्याने हिरवे शर्ट आणि चॉकलेटी पॅण्ट घातलेली होती. दोघांचेही वय अंदाजे ३० ते ३५ च्या दरम्यान होते. त्यांच्या दुचाकीवर माऊली असे लिहिले होते. या दगडफेकीत बसचे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले. घटनेच्या वेळी बसमध्ये ३५ प्रवासी प्रवास करीत होते. मात्र सुदैवाने एकाही प्रवाशाला कुठलीही इजा झाली नाही. पुढील तपास शहर पोलिस ठाण्याचे पोहेकॉ दत्तात्रय नागरे हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...