आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामोन्नती प्रतिष्ठान:विद्यार्थी खेळताना करतात बोलक्या भिंतींचे वाचन ; शैक्षणिक सुधारणा चळवळीचा वसा

सिंदखेड राजा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सावखेड तेजन हे मोठ्या लोकसंख्येचे गाव म्हणून पंचक्रोशीत ओळखले जाते. येथील मराठी शाळेत पहिली ते चौथी, हायस्कूलचे पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण आहे. शेजारील अनेक गावांचे विद्यार्थी सावखेड तेजन येथे शिक्षण घेण्यासाठी यायचे, परंतु कालांतराने गावातील शाळेकडे व शिक्षणाकडे गावकऱ्यांचे व शिक्षकांचे दुर्लक्ष होत गेल्याने अनेक गोष्टीचा ऱ्हास पावला. गावातील बहुसंख्य लोक शेती व शेतीपूरक व्यवसाय करत असल्यामुळे गावकऱ्यांचे शाळेकडे दुर्लक्ष होत गेल्यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावत गेला. या बाबी लक्षात घेवून गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावकऱ्यांच्या सहकार्याने ग्रामोन्नती प्रतिष्ठानची संकल्पना मांडून एक सामजिक संघटन स्थापन केले. या संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासोबत गावामध्ये अनेक ठिकाणी शैक्षणिक साहित्यांच्या बोलक्या भिंती तयार केल्यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणाकडे ओढा वाढू लागला आहे. या बोलक्या भिंती विद्यार्थ्यांना खेळतानाही शिक्षण घेण्यास मदत करत आहेत.

दिवाळी निमित्त गावातील तरुणांनी वर्ग पहिली ते चौथीच्या ९८ विद्यार्थ्यांना प्रत्येकी चार वह्या, एक पेन्सिल, एक खोड रबर, एक शॉपनर व इतर साहित्य देवुन मुलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण केला. यासोबतच जि.प.के.प्राथमिक शाळा सावखेड तेजनचे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण होण्यास मदत होत आहे. त्याच बरोबर ग्रामोन्नती प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांच्या पालकांना मार्गदर्शनही केले जात आहे. वेळोवेळी शिक्षणासंदर्भात मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांमध्ये बद्दल घडताना दिसून येत आहे. यासोबतच शिक्षणाचा दर्जा उंचावत आहे. विद्यार्थी गावामध्ये फावल्या वेळात खेळतांना बोलक्या भिंतींचे वाचन करताना दिसतात. यामुळे मुलाचे सहज हसत खेळत शिक्षण होत आहे. या उपक्रमाने गावातील विद्यार्थांना शिक्षणाची आवड निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल यात शंका नाही. ग्रामोन्नती प्रतिष्ठानचा उपक्रम फायदेशीर असून ग्रामोन्नती प्रतिष्ठानचे कार्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरत आहे.

बातम्या आणखी आहेत...