आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत जोडो पदयात्रेच्या मार्गाची पाहणी करण्याकरिता जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आव्हाड रविवारी शेगाववरून जलंबकडे जात असताना खेर्डा गावानजीक दुचाकी अपघातात शेतकरी व त्यांचा मुलगा जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होते. ही बाब सारंग आव्हाड यांच्या निदर्शनास येताच ताफा थांबवत अपघातग्रस्तांची विचारपूस करून त्यांना पोलिसांच्या वाहनातून रुग्णालयात पोहोचवून वैद्यकीय मदत मिळवून दिली.
सारंग आव्हाड यांच्यासोबत उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी, जलंब पोलिस ठाण्याचे ठाणेदार धीरज बांडे आदी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा होता. बाळापूर ते शेगाव मार्गाची पाहणी करून पोलिसांचा ताफा शेगाव ते जळगाव जामोदमार्गे जात होता. जलंब येथील शेतकरी राजू दोरकर व त्यांचा मुलगा दुचाकीने शेगावकडे येत असताना दुपारी साडेतीनच्या सुमारास खेर्डा गावानजीक रस्त्यावर कुत्रा आडवा आल्याने त्याला वाचवण्याच्या नादात दोरकर यांच्या दुचाकीचा अपघात घडला. या अपघातात दोघे बाप-लेक जखमी झाले व ते रस्त्यावरच पडून होते. त्यांच्या हाताला व चेहऱ्याला मार लागला होता.
पोलिसांचा ताफा याच मार्गावरून जात असताना पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांना दुचाकीचा अपघात झाल्याचे दिसले. यांनी वाहनांचा ताफा थांबवला. त्यांनी पोलिसांच्या मदतीने ताफ्यातील शेगाव ग्रामीण पोलिसांची गाडी अपघातग्रस्तांना उपलब्ध करून देत तातडीने शेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी पाठवले. तसेच अपघातग्रस्त वडील आणि मुलाला धीर देत पोलिसांना सूचना केल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.