आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाणा:स्वाभिमानी हेल्पलाईनने बनवले अ‍ॅप; बेडसाठी रुग्णांची भटकंती थांबणार, वेळेत उपचार मिळण्यासाठी रविकांत तुपकरांचा पुढाकार

बुलडाणाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका क्लिकवर समजणार बुलडाण्यातील कोविड सेंटरमधील बेडची स्थिती

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शासकीय आणि शासन मान्य कोविड सेंटर हाऊसफुल्ल झाले आहेत. यामुळे अनेक गंभीर रुग्णांना बेड मिळत नाही. परिणामी वेळेत उपचार होत नसल्याने रुग्ण दगावत आहे. आपल्या रुग्णाचा जीव वाचावा म्हणून नातेवाईक जीवाचे रान करत आहेत. या दवाखान्यातून त्या दवाखान्यात अशी भटकंती करूनही बेड मिळणे दुरापास्त झाले आहे. ही हृदयद्रावक स्थिती पाहता वेळेत औषधोपचार मिळून रुग्णांचा जीव वाचावा, बेड मिळविण्यासाठी कुणाचीच परवड होऊ नये, यासाठी बसल्या ठिकाणी जिल्हाभरातील कोविड केअर सेंटरमधील बेडच्या उपलब्धतेची स्थिती तत्काळ कळावी, या उद्देशाने स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरने ग्रोवसरी अ‍ॅप तयार केले आहे. या माध्यमातून रुग्णांची गैरसोय दूर होण्यास मदत तर होईलच, पण त्याचा लाख मोलाचा जीव वाचवणे शक्य होईल, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सध्या प्रायोगिक तत्वावर हे अ‍ॅप बुलडाणा शहरापुरते मर्यादित असून लवकरच त्याचा जिल्हाभर विस्तार करण्यात येईल असे सांगत रविकांत तुपकर म्हणाले की, सध्या कोरोनाची भयावह स्थिती उद्भवली आहे. रोज हजारावर नवीन रुग्ण आढळून येत आहेत. गंभीर रुग्ण आपल्या नातेवाइकांसमोर दगावत आहेत. स्मशानभूमीत अंत्यविधीला जागा उरली नाही, असे हृदय पिळवटून टाकणारे चित्र आपल्या अवतीभवती पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांचा जीव वाचविण्यासाठी आपल्याला थोडेथोडके प्रयत्न अप्रत्यक्षरित्या का होईना करता यावेत, या विचाराने एका क्लिकवर बसल्या ठिकाणी अॅप्लिकेशनची संकल्पना सुचल्याचे सांगून ते म्हणाले, कोरोना हा सर्वांच्या अग्नी परीक्षेचा काळ आहे.

जिवाभावाची, नात्यागोत्याची, आपुलकीची माणसं जगाचा निरोप घेत आहेत. आपण डॉक्टर नाही, रुग्णांवर उपचार करू शकत नाही. पण काही क्षणाचा विलंब झाला तर रुग्णाचा मृत्यू होतो. मृत्युच्या दारात उभ्या असलेल्या रुग्णाला दवाखान्यात जागा मिळाली नाही, तर तो निश्चितच प्राण सोडतो. जिल्ह्यात दररोज असंख्य रुग्णांची बेडसाठी दवाखान्याच्या शोधात भटकंती होते. कोणत्या कोविड सेंटर मध्ये किती बेड आहेत, आय.सी.यु, ऑक्सिजन बेडची सद्यस्थिती कशी आहे, याची माहिती प्रत्येकाच्या मोबाइलवर किंवा संगणकावर उपलब्ध व्हावी, यासाठी ग्रोवसरी अ‍ॅप जनतेला समर्पित करीत असल्याचे तुपकर यांनी सांगितले. सामाजिक भान आणि नैतिक जबाबदारी ओळखून आपण जनसेवेसाठी कामी यावे, एवढाच निर्मळ हेतू यामागचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

असे हाताळावे अ‍ॅप
प्ले स्टोअर वरून ग्रोवसरी या नावाने सर्च करून अ‍ॅप डाऊनलोड करता येईल. तसेच यासाठीची लिंक एकमेकांना मोबाईल व्हाटसअप वर पाठविता येईल. अ‍ॅप ओपन केल्यावर इमर्जन्सी टॅब यावर क्लिक करावे. पुढे वेब पेज ओपन होऊन प्रत्येक कोविड रुग्णालयांमधील बेडची स्थिती समजेल. तसेच फोनच्या आयकॉनवर क्लिक केल्यास संबंधित रुग्णालयाला कॉलही करता येणार आहे.

अ‍ॅप जास्तीत जास्त शेअर करा
या अ‍ॅप्लीकेशनमुळे रुग्णांचा बहुमुल्य वेळ वाचून कदाचित त्याला जीवनदान मिळू शकते. सध्या ही सुविधा प्रायोगिक तत्वावर बुलडाणा शहरात सुरु करण्यात आली आहे. लवकरच ही सुविधा औरंगाबादसह अन्य शहरांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. प्रत्येक कुटुंबातील कोरोना ग्रस्ताची गैरसोय टळून वेळेत उपचार मिळण्यासाठी अ‍ॅप जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावे, अशी विनंती रविकांत तुपकर यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...