आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'स्वाभिमानी'चे अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन:हजारो शेतकरी मुंबईकडे रवाना; सोयाबीन, कापसाला हमीभाव देण्याची मागणी

बुलढाणा7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
जलसमाधी आंदोलनासाठी बुलढाण्यातून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी मुंबईला रवाना झाले आहेत.

सोयाबीनला एका क्विंटलमागे 6 हजार रुपये, तर कापसाला 12, 500 रुपये हमीभाव द्यावा, यासह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

सरकारने मागण्या मान्य कराव्यात, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे उद्या अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन करण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आहे.

प्रेते पाहून डोळे उघडतील

आंदोलनासाठी बुलढाण्याहून हजारो शेतकरी आज मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. अरबी समुद्रातील आमची प्रेते पाहून तरी मंत्रालयात बसलेल्या सरकारचे डोळे उघडतील, अशी घणाघाती टीका रविकांत तुपकर यांनी केली.

अद्याप नुकसान भरपाई नाही

मुंबईला रवाना होण्यापूर्वी आज बुलढाण्यात माध्यमांशी संवाद साधताना तुपकर म्हणाले, अतिवृष्टीमुळे राज्यात सोयाबीन व कापूस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. सोयाबीनच्या एका क्विंटल उत्पादनासाठी शेतकऱ्याला जवळपास सहा हजार रुपये खर्च येतो. मात्र, बाजारभाव केवळ 5 ते साडेपाच हजार रुपयेच मिळत आहेत. शेतकऱ्याचा साधा उत्पादन खर्चही निघत नाहीये.

68 टक्के शेतकऱ्यांचा प्रश्न

तुपकर यांनी सांगितले की, राज्यात 50 टक्के शेतकरी सोयाबीनचे उत्पादन घेतात. तर, 18 टक्के शेतकरी कापसाचे उत्पादन घेतात. म्हणजेच जवळपास 68 टक्के शेतकऱ्यांशी निगडीत हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून आम्ही मेळावे घेत आहोत. तरीही शेतकरी आमच्या आंदोलनाची साधी दखल घ्यायला तयार नाही.

पीक विमा कंपन्यांनी फसवले

तुपकर म्हणाले, शेतकरी 68 टक्के शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. सरकार निगरगट्ट झाले आहे. सरकारला आमची प्रेतेच बघायची असतील तर बघून घ्यावी. पीक विमा कंपन्यांनीही शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. नियमीत हफ्ते भरूनही शेतकऱ्यांना विमा मिळत नाही. शेतीला दिवसा वीज द्यावी, अशी आमची मागणी आहे. मात्र, सरकारने अजून यावर निर्णय घेतलेला नाही.

रब्बीही धोक्यात

तुपकर म्हणाले, शेतीला पाणी देताना अनेक शेतकऱ्यांचे ट्रान्सफार्मर जळाले आहेत. या शेतकऱ्यांना अजून नवीन ट्रान्सफार्मर देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अतिवृष्टीमुळे खरीप हातातून गेलेच, तर आता रब्बीही हातातून जाण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कितीही दडपशाहीचा मार्ग अवलंबला तरीही आम्ही आंदोलनावर ठाम आहेत.

श्रेय सरकारने घ्यावे

तसेच, सरकारने निदान आमच्याशी चर्चा करावी. नंतर निर्णयाचे श्रेय त्यांना घ्यायचे असेल तर सरकारने जरूर घ्यावे. आमची ही लढाई श्रेयासाठी किंवा राजकीय नाही. शेतकऱ्यांच्या समस्या दूर व्हाव्यात, या एका भावनेने आम्ही आंदोलन करत असल्याचे तुपकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...