आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:मोताळा तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार घ्या; कार्यकर्त्यांचे निवेदन

मोताळा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील नागरिकांच्या विविध प्रकारच्या समस्या आहेत. तालुक्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. नागरीक समस्या, अडचणी घेवून तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे जनता दरबार भरवल्यास त्यामध्ये नागरिकांच्या समस्या मांडता येतील. यासाठी जनता दरबार घेण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे शनिवारी केली आहे.

निवेदनात म्हटले, तालुक्यातील नागरिकांच्या विविध शासकीय कार्यालयातील अनेक समस्या आहेत. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. त्यांच्यावर कोणाचाही वचक नसल्याने ते नागरिकांना वेठीस धरतात. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांचे अनेक प्रश्न रेंगाळले आहे. त्यामध्ये मोताळा नगर पंचायतींचा पाणी प्रश्न, घरकुलांसंबंधी निधीचा प्रश्न, डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नाचा समावेश आहे, तालुक्यात विद्युत विकासासंबंधी शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत. पंचायत समिती अंतर्गत घरकुलांच्या कामा संबंधीच्या अडचणी आहेत. सोबतच विविध कार्यालयासंबंधी नागरिकांच्या अडचणी आहेत. सर्वसामान्य जनता तुमच्यापर्यंत त्यांच्या अडचणी पोहोचवू शकत नाही. त्यामुळे आपण वेळेनुसार मोताळा येथे सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचा जनता दरबार भरवण्यात यावा. जेणेकरून या दरबारात नागरिक आपल्या समस्या मांडू शकतील, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सुनील कोल्हे, माजी तालुका अध्यक्ष सुनील घाटे, प्रदेश डॉक्टर सेलचे सरचिटणीस डॉ. शरद काळे, शहर अध्यक्ष संदीप वानखेडे आणी सदाशिव घाटे यांनी केली आहे. त्यावर मोताळा येथे लवकरच जनता दरबार भरवण्यात येईल, असे आश्वासन शिंगणे यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...