आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरिष्ठ स्तरावर चौकशी:चार हजारांची लाच घेताना सुलतानपूर येथील तलाठी एसीबीच्या जाळ्यात

मेहकर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिक्रमणाच्या चौकशीचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवण्यासाठी तक्रारदाराकडून चार हजार रुपयाची लाच स्वीकारताना सुलतानपुरचा लाचखोर तलाठी प्रमोद दांदडे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून अटक केली आहे. ही कारवाई आज ५ ऑगस्ट रोजी सुलतानपूर येथील हॉटेल भोलेनाथ भोजनालय अ‍ॅन्ड वाईन बार जवळ करण्यात आली आहे. या कारवाईमुळे महसुल प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील तक्रादारासह त्याच्या दोन साथीदारांच्या गावातील ई क्लास मधील भाडेपट्टीवर घेतलेल्या शेतीच्या वहिवाटीच्या रस्त्यावर गावातीलच एका महिलेने अतिक्रमण केल्याची तक्रार लोणार तहसीलदार यांच्याकडे केली होती. या तक्रारीबाबत तहसीलदार यांच्याकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीत तहसीलदार यांनी तक्रारदार व त्यांचे साथीदार यांच्या वहिवाटीच्या रस्त्यावर अतिक्रमण केले आहे किंवा नाही, याबाबत तलाठी, ग्रामसेवक व मंडलाधिकारी सुलतानपूर यांना चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगीतले होते. परंतु हा चौकशी अहवाल वरिष्ठ स्तरावरून लवकर पाठविण्यासाठी तलाठी प्रमोद हरीभाऊ दांदडे यांनी तक्रारदाराकडे चार हजार रुपये लाचेची मागणी केली. परंतु लाच देण्यास मान्य नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. यावेळी भोलेनाथ भोजनालयाजवळ तक्रारदाराकडून चार हजार रुपयाची लाच स्वीकारताना तलाठी दांदडे यास आज शुक्रवारी एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली आहे. प्रकरणी वृत्त लिहिपर्यत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीचे पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, पो.हे.कॉ. राजू क्षीरसागर, पो.ना. प्रवीण बैरागी, जगदीश पवार, पो.कॉ. अझरुद्दीन काझी व चालक अरशद शेख यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...