आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यासाठी नागरिकांची फरफट:मोताळ्यातील तहसील, पंचायत समिती, बसस्थानकातील जलमंदिर कोरडेठाक, रिष्ठांचे दुर्लक्ष; जलमंदिर उरले कामापुरते

मोताळा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात असलेले जलमंदिर हे कामापुरते उरले आहे. नेहमी या जल मंदिरात पाण्याचा ठणठणाट असतो. सोबतच सर्वात जास्त रहदारी असलेल्या बस स्थानकातील जल मंदिर सुद्धा मागील काही दिवसांपासून कोरडेठाक पडले आहे. तसेच या जलमंदिराची देखभाल व दुरुस्ती नसल्याने त्यांची जीर्ण अवस्था झाली आहे. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी इकडे तिकडे भटकावे लागत आहे. नाइलाजास्तव नागरिकांना पाणी विकत घेवून आपली तहान भागवावी लागत आहे. परिणामी नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. नागरिकांची हेळसांड थांबवण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

येथील तहसील कार्यालयात तालुक्यातील हजारो नागरिक दररोज कामानिमित्त येथे येतात. त्यातच मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत आहे. नागरिकांना तहान लागल्यास त्यांची तृष्णा भागवण्यासाठी येथील तहसील कार्यालयात पाण्याची कुठलीच व्यवस्था नाही. मागील काही वर्षांआधी येथील तहसील कार्यालयाच्या आवारात पाण्याची टाकी बांधण्यात आली होती. त्यानंतर आजपर्यंत ही त्या पाण्याच्या टाकीत पाणी भरण्यात आले नाही. यावरही कळस म्हणजे या पाण्याच्या टाकीची देखभाल व दुरुस्ती देखील करण्यात आली नाही परिणामी त्या पाण्याच्या टाकीची जीर्ण अवस्था झाली असून ती शोभेची वस्तू बनली आहे. तर अशीच अवस्था येथील पंचायत समिती कार्यालयातील आहे.

येथे मोठी पाण्याची टाकी बांधण्यात आली असून नागरिकांना पिण्यासाठी थंड मिळावे यासाठी फ्रिजर देखील बसवण्यात आले आहे. परंतु येथील पाण्याच्या टाकीत पाणीच भरल्या जात नसल्यामुळे पंचायत समितीमध्ये येणाऱ्या नागरिकांना घोटभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सोबतच सर्वात जास्त रहदारी असलेल्या बस स्थानक परिसरात असलेली पाण्याची टाकी मागील काही दिवसांपासून कोरडी पडली आहे. या टाकीच्या नळाची बहुतांश वेळा तोडफोड करण्यात आली असून त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. परंतु काही लोकांनी पुन्हा या टाकीचे नळ तोडले आहे. त्यामुळे या पाण्याच्या टाकीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातील महत्वाचे असणारे तहसील कार्यालय, पंचायत समितीचे कार्यालय, बस स्थानक येथे असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या कोरड्या पडल्या आहेत. भविष्यात उन्हाचा पारा आणखी वाढणार असून उष्णतेमुळे नागरिकांच्या जीवाची लाही लाही होणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांसह नागरिक करत आहेत

बातम्या आणखी आहेत...