आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायापालट:जिल्हा न्यायालयाची 114 वर्षे जुनी इमारत होणार जमीनदोस्त

बुलडाणा5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकशे चौदा वर्षे जुना झालेल्या जिल्हा न्यायालयाच्या परिसराचा कायापालट करण्यात येणार असून ४३ कोटी रुपये खर्चून नवीन इमारत बांधकाम होणार आहे. या बांधकामाला १७ नोव्हेंबर रोजी विधी व न्याय विभागाने मंजुरी दिली आहे. पक्षकारांना, वकिलांना व न्यायाधीशांना सुविधा देणारी ही इमारत बेसमेंट, तळ मजला अधिक पाच मजले अशी असणार आहे. या बांधकामापूर्वी जुनी इमारत पाडण्यात येणार आहे.

बुलडाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयाची जुनी इमारत होती. आठ वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय नवीन नियोजन भवनात स्थानांतरित झाले आहे. या परिसरातील इतर कार्यालयानांही नवीन इमारती मिळाल्या आहेत. तर भूसंपादन विभागाचीही नवीन इमारत होणार आहे. जिल्हा उद्योग केंद्राचीही नवीन वास्तू तयार झाली आहे. परंतु, जिल्हा न्यायालयाची १९०८ पासूनची वास्तू जुनीच आहे. जिथे सध्या काही न्यायालय आणि बार रुम आहे. या जुन्या इमारतीला शंभर वर्ष झाल्यामुळे वकील संघ व जिल्हा न्यायाधीशांनी प्रस्ताव पाठवून नवीन इमारतीची मागणी केली होती. अखेर या मागणीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याचा शासन निर्णय १७ नोव्हेंबर रोजी प्राप्त झाला आहे. त्यानुसार ४३ कोटी ९३ लाख रुपये इतक्या अंदाजित खर्चाला मान्यता मिळाली आहे.

अशी आहे खर्चास मान्यता
बांधकाम खर्च २५ कोटी ९२ लाख ५० हजार, रेन वॉटर हार्वेस्टिंग १० लाख, अपंगांकरता सरकता जिना ५ लाख, फर्निचर ३ कोटी ७ लाख, पाणी पुरवठा व मलनिस्सारण १ कोटी २९ लाख, विद्युतीकरण १ कोटी २९ लाख ६२ हजार, बाह्य विद्युतीकरण १ कोटी ५५ लाख ५५ हजार, अग्निशमन यंत्रणा २५ लाख रुपये. रस्ते ३४ लाख ९४ हजार, वाहतूक व्यवस्था ५ लाख, जमीन सपाटीकरण ५ लाख, माती परीक्षण व भूमी परीक्षण २ लाख, मैदान विकास ५ लाख, सीसीड्रेन व सीडी वर्क १० लाख रुपये, वॉटर मेन स्टोरेज, पंप हाऊस व बोअरवेल १० लाख, स्वच्छता गृह ५ लाख, आकस्मिक खर्च १ कोटी ३ लाख ७० हजार, वस्तू व सेवा कर ६ कोटी १७ लाख ६७ हजार, कामगार विमा १७ लाख, कन्सल्टन्सी चार्जेस ५१ हजार ४७ हजार.

पहिल्या माळावर मिळणार सुविधा
सहा मजल्यांच्या या इमारतीत ग्राउंड माळा हा पार्किंगसाठी राहणार आहे. वकिलांसाठी हा माळा राहणार असून पहिला माळा मात्र पक्षकारांच्या सोयीसाठी राहणार आहे. बँकिंग सुविधा, एटीएम, टायपिंग, संगणक टायपिंग, पोस्ट कार्यालय सुविधा, झेरॉक्स, कॅन्टीनमध्ये नास्ता व जेवणाची व्यवस्था राहणार आहे. ही सुविधा पक्षकांरासाठी महत्वाची राहणार आहे. १५०० चौरस फूट जागेत बार रुम राहणार आहे. प्रत्येक माळ्यावर बार रुमची व्यवस्था होणार आहे. विविध प्रकारचे न्यायालय त्या- त्या माळ्यावर राहणार आहे. सर्वात शेवटच्या माळ्यावर जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे राहणार आहे. अशी माहिती वकील संघाचे वतीने देण्यात आली.

न्यायालयाची इमारत उभी राहणार याचा आनंद
न्यायालयाची इमारत शंभर वर्षे जुनी आहे. या जागी नवीन इमारत व्हावी म्हणून वकील संघाचे वतीने निवेदन देण्यात आले होते. वकील संघ व जिल्हा न्यायाधीशांनीही मागणी केली होती. नवीन इमारतीत सुविधा राहणार आहेत व वकिलांना बसण्यासाठी १५०० चौरस फुटाची खोली राहणार आहे. वकिलांच्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था वेगळी राहील, वकिलांची व न्यायाधीशांची उद्वाहिका वेगळी असणार आहे. या नव्या इमारतीचा आनंद सर्व वकिलांना आहे.ॲड.विजय सावळे, अध्यक्ष वकील संघ

बातम्या आणखी आहेत...