आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्पन्न घटले:जिल्ह्यातील अवैध गौण खनिजांच्या चोरट्या वाहतुकीला आळा घालण्यात प्रशासन कमी; चोरटी वाहतूक जोरात असली तरीही गौण खनिजांची कर वसुली घटली

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मार्च महिन्याअखेरीस आर्थिक वर्षात महसुली उत्पन्न १५० टक्के झाले असून गौण खनिजांची वसुली मात्र ९६.३१ टक्के इतकीच झाली आहे. मोठ्या प्रमाणात गौण खनिजांची वाहतूक होत असतानाही ही वसुली मात्र कमीच झाली आहे. महसुली उत्पन्न १२५५ लाखांनी अधिक झाले असून गौण खनिजापासून उत्पन्न मात्र ३५४ लाखांनी कमी झाले आहे. पूर्णा आणि नळगंगा नदीचे पात्र वाहणाऱ्या मलकापूर, नांदुरा, जळगाव, खामगाव भागात गौण खनिजाची वसुली चांगली आहे. मात्र खडकपूर्णा वाहते त्या परिसरातील देऊळगाव राजा, पैनगंगा नदी वाहणाऱ्या मेहकर, बुलडाणा भागात गौण खनिजांची वसुली कमी झाली आहे. वास्तविक या भागात गौण खनिजांची चोरटी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असतानाही त्याकडे महसूल प्रशासनाचा कानाडोळा होत आहे.

बुलडाणा जिल्हा हा अजिंठा आणि सातपुडा डोंगररांगात वसलेला जिल्हा आहे. जिल्ह्यातून पैनगंगा, खडकपूर्णा, नळगंगा, कोरोडी, मन, विश्वगंगा, उतावळी, बाणगंगा, बाण अशा नद्यांचे प्रवाह वाहतात. या नद्यांच्या पात्रातून वाळू उपसा करणारी अनेक अवैध वाहने दिसतात. मात्र, असे असतानाही मेहकर तालुक्यात ४६.२२, लोणार तालुक्यात ४१.३४, देऊळगाव राजा तालुक्यात फक्त २५.२३ टक्के वसुली गौण खनिजांवर झाली आहे. त्यामानाने नांदुरा तालुक्याची १८० टक्के, जळगाव जामोद १०५.७२ टक्के अशी उद्दिष्टपूर्ती करणारी वसुली झाली आहे. सर्वाधिक गौण खनिजांची चोरटी वाहतूक मोठ्या प्रमाणात होणारे तालुके कमी का पडले आहेत? याबाबत महसूल प्रशासनाबाबत संशय व्यक्त होत आहे.

एकूण जिल्ह्याचे गौण खनिजांचे उद्दिष्ट ९५७८ लाख इतके होते, परंतु ९२२४.८३ इतकेच उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. महसुली उद्दिष्ट २५०० लाख होते. मात्र प्रत्यक्षात ३७५५ लाख इतके उत्पन्न झाले आहे. दोन्ही महसुली उद्दिष्ट १०७.४७ इतके झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...