आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील देऊळगाव माळी येथील कोराडी धरणाच्या सांडव्याच्या भिंतीला भगदाड पडले असून त्याचे दगड निखळून पडल्याने ही भिंत कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील गावांना धोका निर्माण झाला आहे. जलसंधारण विभागाला मात्र त्याचे गांभीर्य नसल्याचे दिसते.
मेहकर शहराला तसेच तालुक्यातील अनेक गावांनाही कोराडी प्रकल्पावरून पाणीपुरवठा केला जातो. या धरणाची भिंत व सांडवा दगड-मातीपासून तयार करण्यात आला आहे. या धरणामुळे परिसरातील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली आली आहे. मात्र, जलसंधारण विभागाकडून धरणाची योग्यप्रकारे देखभाल व दुरूस्ती केली जात नसल्याचे दिसत आहे. परिणामी सांडव्याच्या संरक्षक भिंतीचे दगड निघाले असून, तिला भगदाड पडले आहे. याबाबत जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात कळवले असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. जलसंधारण विभागाच्या दुर्लक्षामुळे सांडव्याच्या भिंतीला पडलेले भगदाड अद्यापही कायमच आहे. या धरणाच्या सांडव्याला धोका निर्माण झाल्यास खालील बाजूस असलेल्या अनेक गावांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. जलसंधारण विभाग एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
२५ किमीच्या कालव्याला लागले ग्रहण
कोराडी प्रकल्पावरील २५ किमीच्या कालव्यांची दुर्दशा झाली आहे. कालवे जागोजागी फुटले आहेत. त्यात कोराडी प्रकल्पातून पाणी सोडल्यास शेतकऱ्यांसाठी ते शाप ठरत आहे. हे पाणी शेतांमध्ये जात असून, त्यामुळे पिकांंचे नुकसान होत आहे. मागील अनेक वर्षांपासून या कालव्याची दुरुस्ती आणि साफसफाई करण्यात आली नाही. त्यामुळे साफसफाईसाठी आलेला निधी जातो तरी कुठे, असा प्रश्न लोकांना पडला आहे. कालव्याची स्थिती बिकट असल्याने पाणी सोडता येत नसल्याने शेतांमधील हरभरा आणि गहू वाळत आहे. त्यामुळे धरणात पाणी मावेना आणि शेतकऱ्यांना पाणी मिळेना अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
उपायांसाठी आदेश देणार
सांडव्याला पडलेले भगदाड धोकादायक ठरणार आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करणार आहे. तसेच उपाययोजना करण्यासाठी आदेश देणार आहोत. धरण व कालव्याच्या देखभाल व दुरुस्तीसाठी शासनाने दिलेल्या पैशांचे काय झाले याची चौकशी करण्याचेही आदेश दिले जातील.- डॉ. संजय रायमूलकर, आमदार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.