आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगदान:देऊळगाव राजाच्या विकासासाठी जाधव परिवाराचे योगदान महत्त्वाचे

देऊळगावराजाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्रसिंह जाधव हे क्रीडा व कलाप्रेमी होते, स्वभावाने प्रेमळ होते. महाविद्यालयाच्या स्थापनेवेळी मला त्यांच्यासोबत काम करता आले, त्यांचा सहवास लाभला. त्यांचे महाविद्यालय स्थापनेमागील ध्येय हे दूरदृष्टीचे होते. त्यामुळे देऊळगाव राजा शहरासाठी राजे जाधव परिवाराचे योगदान हे खूप महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष तुकाराम खांडेभराड यांनी केले.

येथील श्री व्यंकटेश महाविद्यालयात संस्थापक अध्यक्ष राजे राजेंद्रसिंह जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित प्रमाणपत्र व पारितोषिक वितरण समारोहात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर समारोहाचे अध्यक्ष म्हणून श्री बालाजी संस्थानचे वंश-पारंपरिक विश्वस्त व महाविद्यालयाचे विद्यमान अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव यांच्यासह अतिथी म्हणून संत गजानन महाराज बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देवानंद कायंदे, राणीसाहेब छायाराजे विजयसिंह जाधव, बालाजी संस्थानचे व्यवस्थापक किशोर बीडकर, समर्थ कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहेत्रे, श्री व्यंकटेश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांची उपस्थिती होती.

यावेळी देवानंद कायंदे यांनी संस्थापक अध्यक्षांनी काळाची व शहराची गरज लक्षात घेऊन महाविद्यालय सुरू केले. त्यांचा वारसा उच्चविद्याविभूषित असलेले सध्याचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव हे समर्थपणे सांभाळत आहेत, असे मत व्यक्त केले. त्यानंतर किशोर बीडकर यांनी आपले विचार व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना राजे विजयसिंह जाधव यांनी शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या सहकार्याने स्थापन झालेल्या या महाविद्यालयाने अनेक पिढ्या घडवल्या आहेत. या महाविद्यालयात शिक्षण घेतलेले अनेक व्यक्ती आज समाज व राष्ट्र उभारणीत योगदान देत आहेत.

ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगीतले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला संस्थापक अध्यक्ष राजे राजेंद्रसिंह जाधव यांच्या स्मृतिस्थळाचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने चित्रकला स्पर्धा तसेच क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने ॲथलेटिक्स स्पर्धांसह कबड्डी, कुस्ती, बॅडमिंटन, क्रिकेट इ. स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. एन.एस.एस. व एन.सी.सी. विभागाच्या वतीने रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मंजूषा मुळे यांनी तर प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. मधुकर जाधव यांनी व आभार प्रा. सोपान चव्हाण यांनी केले. क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी डॉ. किरण मोगरकर यांनी, चित्रकला स्पर्धा आयोजनासाठी डॉ. ज्योती ढोकले, डॉ. अमोल जाधव यांनी व रक्तदान शिबिरासाठी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. महेंद्र साळवे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. रूपाली तेलगड, सहकार्यक्रम अधिकारी डॉ. रामेश्वर माने यांच्यासह एन.सी.सी. केअर टेकर डॉ. गजानन तांबडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...