आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाईचे परिणाम:जयस्तंभ चौकातील आठवडी बाजारातील गर्दी अखेर हटली ;पोलिसांनी दिला दंडाचा चाप

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहराचा आठवडी बाजारातील जयस्तंभ चौकातील गर्दी आजच्या रविवारच्या आठवडी बाजाराच्या दिवशी दिसून आली नाही. ही गर्दी नगर पालिकेच्या बाजूच्या रस्त्यावर व तार तलाव कॉम्प्लेक्सच्या बाजूने दुकाने लावल्याने दिसून आली. त्यामुळे जयस्तंभ चौकातील ताण कमी झाला आहे. मात्र फेरीवाल्यांनी अंतर्गत जागा मात्र गर्दी सुरु केल्याने त्यांचा त्रास महिलांसाठी डोकेदुखी ठरला आहे. त्यातच बाजारातून ट्रिपल सीट फिरणाऱ्यांवर पोलिसांनी आज वचक निर्माण केला होता.

जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बुलडाणा शहराचा रविवार हा आठवडी बाजाराचा दिवस आहे. त्यामुळे रविवारची सुटी असल्याने शहरातील रहिवासी बाजारात गर्दी करतात. त्यातच शहरालगतचे ग्रामस्थही बाजारात येतात. त्यांना बाजार करताना कोणताही त्रास होऊ नये. याकरता बाजाराचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी नगर पालिका प्रशासनाची आहे. सुरक्षित बाजार व्हावा याची जबाबदारी पोलिसांची आहे. पोलिस आज आपली जबाबदारी सांभाळताना कारंजा चौक ते महात्मा फुले चौकात दिसले. मिसरुडही न फुटलेली मुले ट्रिपल सीट दुचाकी चालवताना पोलिसांनी पकडले. रस्त्यावरच दुचाकीवर बसून मोबाइलवर गप्पा ठोकणाऱ्यालाही दंडात्मक कारवाईची नोटीस आता जाणार आहे. महात्मा फुले चौकात मोकाट मुलेही दुचाकी घेऊन फिरतात.

त्यातही ट्रिपल सीट फिरत असल्याचे आज तरी पोलिसांच्या लक्षात आले असले तरी एखाद दोन कारवाई झाल्यानंतर दुसरा जर ट्रिपल सीट दुचाकी चालवत असेल तर त्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. जयस्तंभ चौकात ऑटो चालकांची गर्दी मात्र कायम होती. रस्त्यावर भरणारा बाजारही काही ठिकाणी कायम होता. अमृत महोत्सवी वर्षातही बुलडाणेकरांसाठी नवीन बाजार नाही. ही संकल्पना मात्र शहरवासीयांना रुजण्यासारखी दिसत नाही.

महिलांच्या गर्दीत फेरीवाल्याची धूम
जिल्हा परिषद हायस्कूल व जिल्हा परिषद यामधील रस्ता जयस्तंभ चौकाकडे जातो. या मधील रस्त्यावर साड्यांची दुकाने लावण्यात आली होती. साहजिकच महिलांसंदर्भातील वस्तू या भागात विक्रीस असल्यामुळे महिलांची गर्दी होणार आहे. मात्र या निमुळत्या जागेत फेरीवाल्यांनी धूम केली होती. अशा गर्दीत महिलांची कुचंबणा होत होती. अशातच एखादा भामटा पर्स मारणे, मोबाइल चोरणे अशा हातचलाखी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होते.

अस्थायी अतिक्रमणाकडे दुर्लक्ष
न्यायालयाच्या बाजूला व समोर अस्थायी अतिक्रमणाने वेढा घातला आहे. हे अतिक्रमण नगर पालिकेने उभारलेल्या फुटपाथवरच असल्याने त्याची गर्दीही रस्त्यावर येते. रस्त्यावर उभी राहणारी फेरीवाले वेगळेच असतात. त्यामुळे शहरवासीयांना जाणाऱ्या अडचणींची जाणीव प्रशासनाला दिसून येत नाही. या अस्थायी कपडे विक्रेत्या अतिक्रमणधारकांना वेगळ्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करावी अन्यथा नेहमीच होणारा त्यांच्या त्रासापासून शहरवासीयांना मुक्त करावे, अशी मागणीही होत आहे.

अंतर्गत रस्त्यावर बाजार भरल्याने बाजार लाइनचा रस्ता होता मोकळा जयस्तंभ चौकापासून ते जनता चौकापर्यंतचा रस्ता आज मोकळा वाटत होता. बाजारच अंतर्गत रस्त्यावर भरला होता. त्यामुळे या रस्त्यावर गर्दी असली तरी अडचण होत नव्हती. आजची बहुतांश खरेदी कृष्णाष्टमी सणाच्या निमित्ताने व गोपाळकाल्याच्या अनुषंगाने होती. पुढचा रविवारी पोळयाची गर्दी बाजारात राहणार आहे. त्यामुळे बाजारासाठी प्रशासन व पोलिस प्रशासनाची शिस्त असणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...