आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऋषिपंचमी:अध्यात्मातून सामाजिक विकासाची संस्कृती वाढीस लागायला हवी ; श्याम उमाळकर यांचे प्रतिपादन

मेहकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

त्याग समर्पण केवळ संतच करू शकतात. संतांनी नेहमी भक्तांना देण्याचे काम केले आहे. मात्र, त्यांचे अनुकरण सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या नेत्यांनी केले पाहिजे. अध्यात्मातून सामाजिक विकासाची संस्कृती वाढीस लागावी यासाठी सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तींनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्याम उमाळकर यांनी श्री संत गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात बोलताना केले.

येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात ऋषिपंचमी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गजाननतात्या कृपाळ होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सेवा समितीचे उपाध्यक्ष सुदेश लोढे यांनी सांगितले की, मागील २४ वर्षापासून श्री संत गजानन महाराज पुण्यतिथी, प्रगट दिन आदी कार्यक्रमांचे भव्य आयोजन केले जाते. सत्यजित पतसंस्थेने ठेवींचा २०० कोटींचा टप्पा पार केला. याच परिवारातर्फे दोन एकर जागेत मंदिर व सभागृह, २० खोल्यांचे भक्तनिवास बांधकाम करण्यात आले. गजानन महाराजांच्या आशीर्वादाने हे घडत असल्याचे लोढे यांनी सांगितले आहे. यावेळी व्यासपिठावर अॅड. साहेबराव सरदार, पंकज हजारी, कैलास सुकदाने,अलका खंडारे, अनिता रणबावरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे स्वागत भूषण मिनासे, राजीव सावजी, श्रीराम निकम, सुरेश मुंदडा, घनश्याम जोशी यांनी केले. देवदत्त महाराज पितळे यांनी प्रवचनातून भक्ती, एकनिष्ठता, अध्यात्मिकतेतून व्यक्ती विकास याबद्दल सविस्तर विवेचन केले.

यावेळी पुढे बोलताना श्याम उमाळकर म्हणाले की, माजी आमदार भाऊसाहेब लोढे यांनी राजकीय कार्यासोबतच शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक कार्यात पुढे घेऊन जाण्याची प्रेरणा दिली. त्यातून श्री संत गजानन महाराजांचे भव्य मंदिर, भक्तनिवास उभे झाले आहे. दरम्यानच्या काळात पतसंस्थेने मोठे कार्य केले असून विविध सामाजीक उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदवला आहे. सत्यजित परिवाराच्या शैक्षणिक संस्थेचा देखील यामध्ये मोठा वाटा आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी अध्यात्माची जोड दिली तर त्याद्वारे समाजोपयोगी कार्य गतीने पुढे जाऊ शकते. पुढील वर्षी गजानन महाराज सेवा समितीच्या कार्याला २५ वर्षे पूर्ण होतील व त्यानिमित्ताने वर्षभर विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे देखील उमाळकर यांनी सांगितले आहे. याप्रसंगी अॅड. साहेबराव सरदार, कैलास सुकदाने, पत्रकार सिद्धेश्वर पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शैलेश बावस्कर यांनी तर आभार पंकज हजारी यांनी मानले. कार्यक्रमानंतर श्रींची महाआरती करून भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी परिसरातील श्रींचे भक्त उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...