आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैलाचा मृत्यू:शेतकऱ्याने केले बैलाचे तेरवे; गावाला गोड जेवण

संग्रामपूर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील काथरगाव येथे गुरुवारी लाडक्या बैलाची तेरवी साजरी करत पशुधनाबाबत प्रेमभावना व्यक्त करण्यात आली. बारा दिवसांपूर्वी या बैलाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या कुटुंबावर शोककळा पसरली. लहानपणापासूनच या बैलाची कुटुंबातील सदस्याप्रमाणे देखभाल करीत बैलाने त्यांच्या शेती कामामध्ये धन्यासोबत काबाड कष्ट केले होते. कुटुंबातील एका सदस्या प्रमाणे बैलाची उत्तरक्रिया करत टापरे परिवाराने नवा पायंडा घातला.

काथरगाव येथील गणेश कैलास टापरे यांच्या शेतात काही वर्षांपूर्वी एक राजस्थानी कुटूंब आले होते. हे राजस्थानी कुटुंबीय आठवडाभर टापरे यांच्या शेतात मुक्कामी होते. यावेळी या लोकांकडे एका गाईला दोन वासरे झाली. त्यापैकी एक वासरु (गोरा) टापरे यांना दिले. तेव्हापासून या वासराची टापरे कुटुंबियांनी त्याची घरातील एका सदस्याप्रमाणे निगा राखली.

आपल्या शेतातील नांगर वखरणी, पेरणी करण्याबरोबरच इतर शेती उपयोगी कामे त्यांच्याकडून करण्यात येत होती. मालकासोबत तब्बल पंधरा वर्ष तो राबत होता. त्यामुळेच टापरे परिवाराला आता चांगले दिवस पहावयास मिळत आहेत. सुखाचा काळ सुरु असतानाच बारा दिवसांपूर्वी या बैलाचा अकस्मात मृत्यू झाल्याने टापरे कुटूंबियावर शोककळा पसरली होती. यावेळी आपल्या काबाडकष्ट करणाऱ्या बैलाबाबत आदरभाव ठेऊन त्याची तेरवीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

ही तेरवी गुरुवारी करण्यात आली, यामध्ये कुटुंबातील एक सदस्य गेल्याप्रमाणे सुतक पाळत बैलाच्या तेरवीचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थिती टापरे परीवाराकडून मिष्टान्न भोजन देण्यात आले. त्यामुळे टापरे कुटुंबियांनी आपली कृतज्ञता व्यक्त करत तेरवीचा कार्यक्रम केला. या तेरवीच्या कार्यक्रमाची परिसरात चर्चा सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...