आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंताजनक:टवाळखोरांवर ‘कडाडणाऱ्या’ ‘दामिनी’ पथकाची कारवाई बंद

बुलडाणा / लक्ष्मीकांत बगाडे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला, मुलींची छेड काढणाऱ्या व शाळा सुटल्यानंतर शाळेलगत थांबणाऱ्या टवाळखोरांना अद्दल घडवण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यात दामिनी पथक कार्यरत होते. गेली दोन वर्षे कोरोनामुळे शाळा बंद होत्या व व्यवहारही बहुतांश ठप्प होते. त्यामुळे अशा टवाळखोरांवर कारवाई होत नव्हती. आता शाळा सुरु झाल्या मात्र दामिनी पथकच पोलिस प्रशासनाने बंद केले आहे. त्यामुळे विद्यार्थिनी, महिला तसेच युवतींचा त्रासही वाढला आहे. शहरात बेटी पढाओची मोठी प्रसिद्धी महिला व बाल कल्याण विभागाकडून सुरु आहे. मात्र, याच बेटी सध्या शाळेत शिकायला जाताना टारगट मुलांच्या टारगेट होत आहे. याबाबत एकही गुन्हा अथवा तक्रार पोलिस स्टेशनला दाखल नाही

शिकेल आई घरादारास पुढे नेई ... ही म्हण खरोखरंच आजच्या काळात लागू पडत आहे. आजच्या महिला या मुलगा असो वा मुलगी त्याचे शिक्षणासाठी स्वतः पुढाकार घेताना दिसत आहे. शाळेत नेणे व आणणे हे सारे सोपस्कार सध्या तिच करत आहे. मात्र, तिलाच आता टवाळखोरांचा सामना करावा लागत आहे. शाळेच्या चौकात असे हे पूर्णपणे मिसरूड न फुटलेले रिकामचोट मुले बापाच्या पैशावर गाड्या घेऊन शाळेभोवती चकरा मारतात. तोंडात गुटखा अन् जिभेला हाड नसलेली ही मुले इतरांसाठीही त्रासदायक ठरत आहेत. अश्लील भाषा वापरत असल्याने महिलांनाही लज्जा पोहोचेल असे कृत्य सध्या शाळा, शिकवणीच्या अवती-भवती सुरु आहे.

मात्र महिला, मुली हे निमुटपणे सहन करुन घरचा रस्ता धरत आहे. याची तक्रार कोणाकडे करावी हा प्रश्नच आहे. शाळेकडे करावी तर शाळेच्या पटांगणात ही मुले येत नाही. मात्र शाळेच्या गेटपर्यंत येण्याचा प्रयत्न करतात. काही मुले तर हाणामारी सुध्दा करतात. शाळेत शिकणाऱ्या मुलांना आमिष दाखवुन मुलींचे पत्ते विचारतात नाव विचारतात. या बदल्यात मुलांच्या इच्छा पूर्ण करतात. असे सारे प्रकार घडत असताना पोलिस प्रशासन मात्र निमुटपणे असे प्रकार खपवून घेत आहे.

पोलिसांनी महिलांना सुरक्षा पुरवणे गरजेचे
महिलांची बाजारात छेड काढणारे, त्यांना धक्का मारुन वाहन चालवणे, पदर ओढणे, अश्लील हावभाव करणे, स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे, असे प्रकार घडण्याची शक्यता अधिक असल्याने पोलिसांनी महिलांना सुरक्षितता पुरवणे आवश्यक आहे. याबाबत पोलिसांना एक मुलींच्या शाळेची मुख्याध्यापिका म्हणून पोलिसांना हे आवाहनच करत आहे. निवेदन देण्याचा विचारही करणार आहे.
-संजीवनी शेळके, मुख्याध्यापिका, शिंदे गुरुजी कन्या विद्यालय, बुलडाणा

तक्रारपेटी उघडणेही बंद
जिल्ह्यातील बहुतांश पोलिस स्टेशनने शाळांमध्ये तक्रार पेटी लावली होती. या तक्रार पेटीमध्ये ज्या मुलींना त्रास आहे. त्या मुलाबाबतची तक्रार टाकल्या जायची. ही पेटी दर शनिवारी पोलिस विभागाचे दामिनी पथक उघडायचे. या दामिनी पथकातील महिला पोलिस त्यानंतर संबधित मुलाला व त्याचे पालकाला तंबी द्यायच्या. दरम्यान, काही वेळा अशा मजनूची धुलाई ही करायचे. त्यामुळे वचक राहत होता. आता दामिनी पथकच बंद आहे.

बातम्या आणखी आहेत...