आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रमसंस्कार शिबिराचा समारोप:कष्टाची सवयच जीवनातील संघर्षावर रामबाण उपाय; प्राचार्य विष्णुपंत पाटील यांचे प्रतिपादन

बुलडाणाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कष्ट करा शिका व संघटित होऊन संघर्ष करा. तसेच विद्यार्थिदशेत लागलेले श्रमाचे व्यसन व कष्टाची सवय ही जीवनातील कोणत्याही संघर्षावर रामबाण उपाय ठरू शकते. त्यामुळेच आपल्या वाट्याला आलेले जीवनकार्य सरळ व सुलभ होतात, असे प्रतिपादन कला महाविद्यालयाचे प्राचार्य विष्णुपंत पाटील यांनी केले.

येथील कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ३० मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत विशेष श्रम संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या शिबिरामध्ये सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत प्रार्थना, प्राणायाम, अल्पोपाहार, श्रमदान, भोजन, वैयक्तिक स्वच्छता, बौद्धिक सत्र, गावकर्‍यांशी गटचर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन असे दैनंदिन कार्यक्रम घेण्यात आले. शिबिरात १ एप्रिल ते ५ एप्रिल या कालावधीत दत्तक ग्राम येळगाव गावातील प्रगती अध्यापक विद्यालय, सम्राट अशोक वाचनालय व बुद्ध विहार, ग्रामपंचायत भवन परिसर, हनुमान मंदिर परिसर, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा परिसर, श्री संत गजानन महाराज मंदिर परिसर, इत्यादी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून सांडपाण्याच्या नाल्यांची स्वच्छता करण्यात आली.

यावेळी श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने कार्यक्रमाधिकारी व सर्व शिबिरार्थींचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच येळगाव ते साखळी या रस्त्यावरील पैनगंगा नदीच्या पात्रात उन्हाळ्यातील रखरखत्या उन्हामध्ये जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी व शेतीची पाणी समस्या सोडवण्यासाठी चार ते पाच फूट उंचीचा बंधारा तयार करण्यात आला. या सर्व श्रमदानातून विद्यार्थ्यांनी श्रमसंस्कारांचे धडे घेतले.

दुपारच्या बौद्धिक सत्रात जिजामाता महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सुबोध चिंचोले यांचे श्रमाचे महत्त्व व्यक्तिमत्व विकास या विषयावर तर जिल्हा व्यवस्थापन कक्षाचे मार्गदर्शक किशोर पाटील यांचे आपत्ती व्यवस्थापन या विषयावर, प्रा डॉ लक्ष्मण शिराळे विदर्भ महाविद्यालय बुलडाणा यांचे संविधान जनजागृती काळाची गरज या विषयावर, प्रमोद टाले, जिल्हा संघटक अंधश्रद्धा निर्मूलन यांचे जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर तर करूणा घोडेस्वार आयसीटीसी समुपदेशक, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे एचआयव्ही जाणीव जागृती व तरुण तरुणींचा सहभाग या विषयावर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.

यावेळी घोडेस्वार यांच्या टीमने शिबिरार्थी विद्यार्थी व विद्यार्थिनी व दत्तक ग्राम येळगाव येथील काही नागरिकाची एचआयव्ही तपासणी सुद्धा करून घेतली. श्रम संस्कार शिबिराचा समारोपीय कार्यक्रम ६ एप्रिल रोजी पार पडला. पुढे बोलतांना ते म्हणाले की, विद्यार्थिदशेतच आपल्यावर श्रम संस्कार हे झालेच पाहिजे, असा आग्रह त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. प्रफुल्ल गवई, प्रगती अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य शिवहरी वाघ व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश बाठे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सुरेश बाठे यांनी, तर सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.विलास टाले यांनी व आभार प्रदर्शन महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. आरती खडतकर यांनी केले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.