आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकट:वायझडी धरणाची पिचिंग उखडली; जलसंधारण विभागाचे साफ दुर्लक्ष, जलप्रवाह निर्माण होण्याची भीती

बुलडाणा3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एके काळी चिखलीकरांची तहान भागवणाऱ्या वायझडी संग्राहक तलावाची पिचिंग उखडली आहे. त्यामुळे शेलुदसह इतर गावांना जलप्रलयाचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, जलसंधारण विभागाचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. चिखलीकरांची तहान भागवणाऱ्या या धरणाची निर्मिती अंदाजे १९६४ च्या काळात तत्कालीन आमदार भारत बोंद्रे यांच्या प्रयत्नातून झाली होती. तेव्हापासून पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेले हे धरण सुमारे एक ते दिड वर्षांपूर्वी जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. मात्र, तेव्हापासून आजपर्यंत कुंभकर्णी झोपेत असलेल्या जलसंधारणाच्या अधिकाऱ्यांनी या धरणाकडे ढुंकूनही पाहिलेले नाही.

कोणतेही धरण बांधताना गाभा, आवरण आणि संरक्षणात्मक दगडी पृष्ठभाग (पाण्याची बाजूस) अशा पद्धतीने बांधण्यात येते. यामध्ये गाभा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. गाभ्यासाठी पाण्याच्या सानिध्यात चिकट व पाणी धरून ठेवणारी निवडतात. अशी माती कमी जाडीच्या थरांमध्ये रोलरने दाबून भरतात. अशा मातीचे अंतर्गत जलधारण सुयोग्य पातळीवर राखणे आवश्यक असते. हे सर्व योग्य पद्धतीने केले तरच गाभा अतिशय घनदाट होतो व पाण्याच्या प्रचंड दाबाला तोंड देऊ शकतो. अर्थात अशीच काळजी आवरण थर देतानाही घेणे आवश्यक असते. पाण्याचा थेट मारा सहन करण्यासाठी दगडाचा थर पाण्याकडील बाजूस देतात. यालाच पिचिंग असे म्हणतात. एका अर्थाने पिचिंग हा धरणाचा आत्मा असतो. तो जर उखडला तर धरण पाण्याच्या माऱ्याला व दबावाला तोंड देऊ शकत नाही. परिणामी धरण फुटून जलप्रलयाचा धोका असतो.
वॉचमनची खोली अजूनही हस्तांतरित केलेली नाही

जलसंधारण विभागाच्या भोंगळ कारभाराचा नमूना वायझडी धरणावर पहायला मिळत असून शासकीय नियमाप्रमाणे प्रत्येक धरणाच्या ठिकाणी वॉचमनसाठी एक खोली बांधलेली असते. मात्र याठिकाणी असलेल्या वॉचमनच्या खोलीवर दुसऱ्याच कोणीतरी अतिक्रमण केले आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते म्हणाले, धरणावर असलेली वॉचमनची रूम आमच्याकडे हस्तांतरित केली नाही. काही अधिकाऱ्यांना तर रूम आहे, हेच माहिती नाही. तसेच या कार्यालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी नसल्यामुळे कामाचा खोळंबा होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

अनेकांच्या शेतात विहिरी

धरण क्षेत्रापासून ३५ मीटर अंतरापर्यंत कोणतेही खोदकाम करता येत नाही. अगदी शेतात विहीर घ्यायची असेल तरी पाटबंधारे विभागाची रितसर परवानगी घ्यावी लागते. असे असताना या परिसरात अनेकांनी आपल्या शेतात विहिरी घेतल्या आहेत. त्यामुळे नियमांची पायमल्ली होत असून अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष आहे.

बातम्या आणखी आहेत...