आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोकादायक:रस्ता उंच पण, खांब थिटे असल्याने वाहनांनी तुटतात विजेच्या तारा

संग्रामपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा जिल्ह्यातील खांडवी ते अकोला जिल्ह्यातील पंचगव्हाण या राज्य महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. परंतु या कामामुळे रस्ता उंच व खांब थिटे पडत असल्यामुळे वाहनांनी खांबावरील वीज तारा तुटत आहेत. त्यामुळे वीज ग्राहकासह शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु याकडे बांधकाम अभियंत्याचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता बळावली आहे. तालुक्यातील पातुर्डा परिसरात गेल्या वर्षभरापासून बुलडाणा जिल्ह्यातील खांडवी ते अकोला जिल्ह्यातील पंचगव्हाण या राज्य महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्याचे व नाल्यांचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी नागरिक आग्रही होते, मात्र या कामात प्रचंड दिरंगाई झाली. आता पावसाळा तोंडावर आला असून हे करू की ते करू, अशी अवस्था बांधकाम विभागाची झाली आहे. रस्ता करताना आवश्यक ते सोपस्कार न करता काम सुरू करण्यात आले आहे. ऐन गावातच आता नागरी समस्या समोर येत आहेत. विजेचे खांब रस्ता रुंदीकरण करण्यापूर्वी हाती घेणे आवश्यक असताना ते करण्यात आले नाही. त्यामुळे आता रस्ता सुमारे दोन ते तीन फूट उंच झाला आहे. तर विजेचे खांब जैसे थे आहेत. या विजेच्या खांबावरून रस्त्याच्या दुतर्फा वीज जोडणी करण्यात आली आहे. रस्ता चांगला झाल्यामुळे या रस्त्याने जाणारी मालवाहतूक वाढली आहे. कापुस, कांदा वा तत्सम साहित्य भरलेली वाहने या रस्त्यावरून जात आहेत. परंतु या वाहनांमुळे विजेच्या तारा तुटत आहेत. वेळप्रसंगी एखादा मजूर वाहनावर चढवून वीज प्रवाहीत तारा बाजूला केल्या जातात. असा जीवघेणा खेळ या रस्त्यावर चालत आहे, याकडे संबंधित विभागाचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत आहे. हा रस्ता इतरत्र चांगला झाला आहे, त्यामुळे या भागात रहदारी वाढली आहे. परंतु जड वाहतुकी संदर्भात जागरूक राहणे गरजेचे झाले आहे. वीज जोडणी तुटून जीवंत तारा पडल्यास अपघाताची शक्यता उदभवू शकते. पावसाळ्यात ही समस्या आणखी भीषण होणार आहे. सध्या यावर तात्पुरती व्यवस्था काय करता येईल, यावर प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.

ठिकठिकाणी नाल्या तुंबल्या राज्य मार्गाचा दर्जा पाहता गावातून सांडपाण्याच्या नाल्यांची विल्हेवाट लावण्यात आली नाही. शाळेजवळ नाली वेडीवाकडी वळणे घेत जाणारी आहे. या नालीत अनेक दिवसांपासून पाणी साचले आहे. एकंदर सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला नाही. त्यामुळे जागोजागी घाण पाण्याच्या नाल्या तुंबल्या आहेत. या सांडपाण्याची विल्हेवाट लावताना ईंजिनीयरींग नियम धाब्यावर बसवून काम करण्यात आले आहे. गावातील सर्व सांडपाणी नदीपात्रात निघेल की नाही शंकाच आहे. पावसाळ्यात ही समस्या अधिक भीषण होणार असल्याचे दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...