आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातीर्थक्षेत्र वरोडी येथील परमहंस श्री तेजस्वी बाबा यांचा ८७ वा जन्मोत्सव सोहळा गुरुवारी उत्साहात साजरा करण्यात आला. या यात्रेला आदल्या दिवशी गावागावातून सव्वाशे दिंड्या दाखल झाल्या होत्या. यावेळी १५१ क्विंटलच्या पुरी आणि १२१ क्विंटल वांग्याची भाजी तर ३ क्विंटल ७५ किलो तेल असा २७६ क्विंटलच्या महाप्रसादाचे एक लाख भाविकांना वितरण करण्यात आले.
तेजस्वी बाबा यांचा जन्मोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मागील दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे महोत्सव साजरा करण्यात आला नाही. त्यामुळे यंदा लाखोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. या उत्सवानिमित्त ७ दिवस संगीत रामायण आणि तुकाराम गाथा पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. सातही दिवस कीर्तनाचा गजर करण्यात आला. गुरुवारी सकाळी महाराज श्रींची शोभायात्रा काढण्यात आली.
सकाळी ९ वाजता अनिरुद्ध महाराज चेके यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद वितरणास प्रारंभ झाला. रात्री ७ वाजता सुभाष सवडदकर यांची गीतमाला, तर रात्री ९ वाजता शाहीर रामानंद महाराज उगले यांचा समाज प्रबोधन कार्यक्रम पार पडला. वरोडी येथे महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाकडून विशेष बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. तसेच भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मेहकर आगाराकडून साखरखेर्डा ते गुंज फाटा, आणि मेहकर ते वरोडी शेलगाव काकडे फाटा अशी बससेवा सुरु करण्यात आली होती. तसेच मेहकर ते साखरखेर्डा मार्गे वडगाव माळी अशी बससेवा वळवण्यात आली होती.
यात्रेत कडेकोट पोलिस बंदोबस्त यात्रेत चोरीच्या घटना तथा वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी ठाणेदार जितेंद्र आडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली किनगावराजा, अंढेरा, मेहेकर, जानेफळ, लोणार, बिबी या ठिकाणाहून सहा पोलिस अधिकारी, साठ कर्मचारी वीस महिला पोलिस कर्मचारी असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान गुंज फाट्यापासून भाविकांचा जत्था बघता शेलगाव फाट्यापासून वाहतूक थांबवण्यात आली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.