आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाययोजनांची गरज:वाहन चालकांसाठी दुसरबीड येथील वळण मार्ग ठरतोय ‘ब्लॅक स्पॉट’ ;अपघातांचे प्रमाण वाढले

दुसरबीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील वळण मार्ग वाहन चालकांसाठी ‘ब्लॅक स्पॉट’ ठरत आहे. मागील काही दिवसापासून या रस्त्यावर सतत अपघात घडत असून अपघाताची मालिका आजतगायत सुरूच आहे. या वळणावर आतापर्यंत परिसरातील चौघांच्या घरावर विघ्न आले असून त्यांच्या परिवारातील सदस्यांचा अपघातात बळी गेला आहे. अपघाताची मालिका थांबवण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

रस्ते हे विकासाच्या धमन्या समजण्यात येत असल्या तरी त्यामध्ये अनेक ठिकाणी काही त्रुटी आढळून येत आहे. दुसरबीड येथून नागपूर- मुंबई महामार्ग गेला असून शहरापासून काही अंतरावरच असलेल्या वळण मार्गावर दिशादर्शक फलक व गतिरोधक नसल्याने हा मृत्यू मार्ग बनला आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या कडा ह्या खचल्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. तर काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध खड्डे असल्याने त्याकडे देखील संबधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. नागपूर-मुंबई महामार्गावर नियमीत वर्दळ असून अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने वाहन धारकांना वाहन चालवताना अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताची संख्या वाढली असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे.

मागील ४ वर्षात दुसरबीड येथील गणपती मंदिराजवळील महामार्गावर अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे त्यांच्या घरावर विघ्न आले असून त्यांना परिवारातील सदस्याला मुकावे लागले आहे. तर अनेक जणांना अपंगत्व व गंभीर दुखापत झाली आहे. यामध्ये २०१८ मध्ये संदीप अंबादास सांगळे वय ३५ वर्ष, २०१९ मध्ये सोमीनाथ ढवळे वय २२ वर्ष, २०२० मध्ये शेख चांद शेख राशद वय २५ वर्ष व नुकताच १६ ऑगस्ट रोजी झालेल्या अपघातात तुकाराम उगले यांचा अपघाताचे बळी घेतला आहे. परिणामी या मार्गाची रूंदी वाढवून झाडेझुडपी काढण्यात यावी तसेच महामार्गाच्या दोन्ही शोल्डर दबईने दाबुन सुरळीत करण्यात याव्या. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने होणारे अपघात टाळण्यासाठी तातडीने पर्याय शोधावा अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

अन्यथा ‘ताला ठोको’ आंदोलन करणार
वळण मार्गावर नियमीत अपघात घडत आहे. दरम्यान या घटनास्थळी सार्वजनिक बांधकाम विभाग व एम.एस.आर.डी.सी यांनी जातीने लक्ष देऊन तिथे ब्रेकर टाकावे अथवा पर्यायी व्यवस्था करा, अन्यथा सांबा विभागाला टाळं ठोरणार.
जुनेद अली, संचालक, कृउबास सिंदखेडराजा

अपघाताची मालिका त्वरित थांबवा
मागील काही वर्षापासून दुसरबीड परिसरात अनेक अपघात घडले असून अनेकांच्या कुटूंबाचा आधार हिरावला आहे. तरी देखील संबधित विभाग याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. वेळीच उपाययोजना करून अपघाताची मालिका थांबण्यासाठी उपाययोजना कराव्या.
संतोष पुरी, ग्रामस्थ, दुसरबीड

वाहनांची फिटनेस तपासणी करा
गाड्या दुर्घटनाग्रस्त होऊन जीवीत हानी झाल्याच्या घटना आपण नेहमी ऐकत असतो. अतिवेग, खराब हवामान, नादुरुस्त वाहने ही अपघाताची मुळ कारणे आहेत. वाहनचालकाने वाहनांचे फिटनेस तपासूनच ते चालवले पाहिजे.
शिवाजी बारगजे, पोहेकॉं पो.स्टे. किनगावराजा

बातम्या आणखी आहेत...