आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाचे दुर्लक्ष:ग्रामस्थांना प्यावे लागते क्षारयुक्त पाणी; किडनीमुळे अनेकांचा बळी ; प्लँट नादुरूस्त

संग्रामपूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही वर्षांपासून आदिवासी बहुल असलेल्या संग्रामपूर तालुक्याला खारपानपट्ट्याचा शाप लागला आहे. आजपर्यंत शेकडो रुग्णांचा किडनी आजाराने बळी गेला असून शेकडो रुग्णांना आजही किडनी आजाराने ग्रासून टाकले आहे. त्यातच तालुक्यातील वरवट बकाल येथील दोन्ही आर ओ प्लँट नादुरूस्त असल्याने ग्रामस्थांना नाइलाजास्तव क्षारयुक्त पाणी प्यावे लागत आहे. परिणामी तालुक्यात किडनी आजाराच्या रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, १४ जून रोजी गावातील शेकडो नागरिकांनी हायटेक कंपनी व जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभाराबाबत नारेबाजी करून निषेध व्यक्त केला आहे. किडनी आजाराचे प्रमाण कमी व्हावे, ग्रामस्थांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, यासाठी तालुक्यातील वरवट बकाल या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गावात हायटेक कंपनीचे दोन आर. ओ. प्लान्ट कार्यान्वीत करण्यात आले होते. या प्लँटच्या माध्यमातून ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. त्यामुळे किडनी आजाराचे प्रमाण देखील कमी झाले होते. परंतु मागील काही दिवसांपासून या दोन्ही प्लँटमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांना नाइलाजास्तव क्षारयुक्त पाणी प्यावे लागत आहे. तालुक्यात किडनी आजाराचे रुग्ण वाढत असल्याने शासनाने अनेक गावांत लाखो रुपये किमतीच्या आर ओ फिल्टर्सची व्यवस्था केली आहे. त्यापैकी एकट्या वरवट बकाल येथे सात वर्षांपूर्वी दोन फिल्टर प्लँट कार्यान्वीत केले आहेत. दरम्यानच्या काळात या प्लँटची जबाबदारी जि. प. प्रशासनाकडे होती. परंतु जि.प. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने पाणी शुद्धीकरण यंत्रणा बिघडली आहे. परिणामी प्लँट मधून पाण्याचे शुद्धीकरण न होता क्षारयुक्त पाणी गेल्या वर्षभरापासून गावकऱ्यांना पिण्यासाठी वापरावे लागत आहे. आज रोजी या पाण्यात पाचशेच्यावर टीडीएस असल्यामुळे नागरिकांना क्षारयुक्त पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. एक रुपयात दहा लिटर शुद्ध पाणी उपलब्ध करुन देणाऱ्या येथील दोन आर ओ प्लँटचे दरमहा पंचवीस ते तीस हजार रुपये संबधित यंत्रणेकडे जमा होत असताना त्यातून गेल्या सात वर्षात एकदाही या प्लँटची दुरूस्ती करण्यात आली नाही. कंपनी विरुद्ध जिल्हा परिषद अशी लढाई सुरू आहे. परंतु या दोघांच्या लढाईत ग्रामस्थ भरडली जात आहेत. मागील सात वर्षांत हायटेक कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पाण्यासाठी एटीएम मधून लाखो रुपयांच्या रिचार्ज कार्ड द्वारे दरमहा वसुली केली आहे. देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर होती. परंतु कंपनीच्या मजुरांचे वेतन न झाल्यामुळे मजुरांनी प्लँटकडे दुर्लक्ष केले. परिणामी जलशुद्धीकरणचे मेमरण खराब झाले असून त्यांचे मेन्टन्स देखील वाढले आहे. त्यामुळे कंपनी व प्रशासन काहीच उपाययोजना करत नसल्यामुळे गावातील नागरिकांना नाइलाजास्तव दूषित पाणी प्यावे लागत आहे. या विषयी ग्रामपंचायत प्रशासनाने जिल्हा परिषदेला चार महिन्यांपूर्वी सूचना दिली आहे. परंतु प्रशासनाने या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. दरम्यान, १४ जून रोजी गावातील शेकडो नागरिकांनी हायटेक कंपनी व जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभाराबाबत नारेबाजी करून निषेध व्यक्त केला आहे.

नाइलाजास्तव क्षारयुक्त पाणी प्यावे लागत आहे ^दोन्ही आर.ओ. प्लँट सात वर्षां पूर्वीचे आहे. त्यातील शुद्धीकरण यंत्रणा कधीचीच कालबाह्य झाली आहे. पुढील अनर्थ टाळण्यासाठी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. -प्रल्हाद दातार, संस्थापक अध्यक्ष, नागरिक हक्क बचाओ आंदोलन समिती.

ग्रामपंचायतचा ठराव मंजूर करून वरिष्ठांना पाठवण्यात येईल ^वरवट बकाल या गावातील दोन्ही आर.ओ.फिल्टरचा करार आता संपला आहे. त्यामुळे येथील ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन तो लवकरच जिल्हा परिषद प्रशासनाला पाठवण्यात येईल. -एम. एन. बोडखे, ग्रामसेवक वरवट बकाल

बातम्या आणखी आहेत...