आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी यावर्षी तूर पेरणीला प्राधान्य दिले आहे. जवळपास ७९ हजार २०८ हेक्टर एवढ्या क्षेत्रावर शेतकऱ्यांनी तुरीची पेरणी केली आहे. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने सद्य:िस्थतीत तुरीचे पीक बहरले असतानाच शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुरीचे उत्पादन घटण्याची शक्यता असन, चांगले उत्पन्न मिळण्याच्या शेतकऱ्यांच्या अपेक्षेला तडा जाण्याची भीती आहे.
शेतकऱ्यांना यावेळी तूरीपासून मोठे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. काही ठिकाणी हे पीक बहरत आले आहे, तर काही ठिकाणी जवळपास पंधरवड्यात हे पीक फुलोऱ्यावर येणार आहे. असे असतानाच, मागील आठवड्यातील रात्रीच्या थंड हवामानामुळे या पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक स्थिती निर्माण झाली आहे. या वातावरणामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांपासून नुकसान होण्याची शक्यता आहे.
असा करा अळीचा ‘बंदोबस्त’ या अळ्यांच्या प्रतिबंधासाठी शेतकऱ्यांनी शेतात प्रतिहेक्टर २० पक्षी थांबे उभारावेत. पक्षी अळ्या फस्त करतात. अळ्यांचा प्रादुर्भाव जास्त असल्यास तुरीखाली पोते टाकून झाड हलवावे. पोत्यावर पडलेल्या अळ्या नष्ट कराव्यात. किडींच्या नियंत्रणासाठी जैविक व रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. ५० टक्के फुलोरा असताना पहिली फवारणी करावी. यात ५ टक्के निंबोळी अर्क किंवा दहा लिटर पाण्यात ५० मिलीलीटर, अझॅडिरेक्टीन ३०० पीपीएम किंवा ५० मिलीलीटर, अझॅडिरेक्टीन १५०० पीपीएम किंवा २५ मिलीलीटर, एचएएनपीव्ही (१․१०९ पीओबी / मिलीलीटर) किंवा ५०० एलई प्रती हेक्टर, बॉसिलस थुरिंनजिएसिस १५ मिलीलीटर, क्विनॉलफॉस २५ ईसी किंवा २० मिलिलिटर मिसळून फवारणी करावी. १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी. इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के एसजी किंवा ३ ग्रॅम, लँबडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही किंवा १० मिलीलीटर, ईथिऑन ५० टक्के ईसी किंवा ४ मिलीलीटर, क्लोरॅनट्रीनीलिप्रोल १८.५ टक्के एससी प्रवाही २.५ मिलिलिटर दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.