आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराच्या बाहेरुन जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या कामासाठी परप्रांतीय मजुरांना आणले होते. परंतु पाच महिन्यांचा कालावधी उलटून गेला असताना देखील त्यांना मजुरीचा मोबदला देण्यात आलेला नाही. त्यामुळे मजुरांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. काम करूनही मोबदला मिळत नसल्यामुळे आक्रमक झालेल्या मजुरांनी कंपनीच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला. त्यावर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुढील आठवड्यात कामाचा मोबदला देण्यात येईल, असे आश्वासन देवून मजुरांना शांत केले. राज्यातील सर्वात महत्वाचा स्व. बाळासाहेब समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे.
या महामार्गाच्या कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या महामार्गामुळे नागपूर- मुंबईचे अंतर अत्यंत कमी झाले असून या महामार्गावरून वाहने सुद्धा सुसाट धावायला लागली आहेत. परंतु हा महामार्ग तयार करण्यासाठी घाम गाळणाऱ्या सिंदखेडराजा तालुक्यातील पॅकेज क्रमांक सात तढेगाव कॅम्प मधील तीनशे मजुरांना त्यांची मजुरी तब्बल पाच महिन्यांपासून मिळालेली नाही. हे सर्व मजूर मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत.
पाच महिन्यांपासून कामाचा मोबदला मिळाला नसल्यामुळे मजुरासह त्यांचा परिवार त्रस्त झाला आहे. पैशा अभावी मजुरांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे हताश झालेल्या मजुरांनी मोबदल्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले असून कंपनी विरोधात हल्लाबोल सुरु केला आहे. रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड या कंपनी मार्फत हजारो मजूर समृद्धी मार्गावर सात नंबर पॅकेज मध्ये काम करीत होते. दिवसरात्र काम करून सुद्धा त्यांच्या घाम गाळलेल्या कामाचा मोबदला दिल्या जात नसल्याने तीनशे मजुरांनी किनगावराजा पोलिसांत तक्रार देण्यासाठी पंधरा किलोमीटर पायी जाऊन प्रयत्न केला, परंतु राहेरी नदीच्या पुलावर हा मजुराचा मोर्चा पोलिसांनी अडविला. त्यानंतर कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. त्यावर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुढील आठवड्यात मजुरांच्या खात्यात त्यांचे वेतन जमा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर मजुरांनी आपले आंदोलन मागे घेतले.
हा गंभीर प्रकार आहे
पॅकेज क्रमांक सात तढेगाव कॅम्प मधील तीनशे मजुरांना त्यांची मजुरी पाच महिन्यांपासून मिळाली नाही. हे सर्व मजूर मध्य प्रदेशातील असून या मजुराचे परिवार त्रस्त झाले आहेत. या गंभीर विषयाची दखल जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव व माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी घेतली असून मजूर महाराष्ट्रातील असो की परप्रांतीय असो मजुराचा घामाचा पैसा मजुराला मिळालाच पाहिजे. संबंधित कंपनीची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात येणार आहे. -शिवा ठाकरे, तालुका प्रमुख बाळा साहेबांची शिवसेनाकंपनी कार्यालयासमोर ठिय्या देतांना परप्रांतीय मजूर.
खाकीतील संवेदनशीलपणा दिसला
समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या तीनशे मजुरांना पाच महिन्यापासून मजुरी मिळाली नाही. त्यामुळे मजूर तक्रार दाखल करण्यासाठी किनगावराजा पोलीस स्टेशन कडे येत होते. या बाबतची माहिती मिळाल्यानंतर ठाणेदार युवराज रबडे यांनी स्वता रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड या कंपनीच्या व्यवस्थापकाशी बोलून मजुरांचा पैसा अद्याप का दिला नाही. तसेच मजुरांना पैसा कधी मिळणार. मजुरांचा पैसा देण्यात यावा, या संदर्भात चर्चा केली. त्यानंतर ठाणेदार रबडे यांनी मजुरांना शांत करून त्यांनी पुढील आठवड्यात कंपनी पूर्ण कामाचा मोबदला देईल. असे मजुरांना सांगीतले. त्यामुळे खाकी वर्दीतील संवेदनशीलता दिसून आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.