आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मठेप:संगनमताने महिलेचा निर्घृण खून केल्याप्रकरणी तीन जणांना जन्मठेप; खामगाव सत्र न्यायालयाचा निकाल, कोक्ता येथे घडली होती घटना

खामगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगनमताने महिलेचा निर्घृण खून केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही घटना तालुक्यातील कोक्ता येथे घडली होती. हा निकाल आज १३ मे रोजी येथील तदर्थ जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक एकच्या न्यायाधीश प्रज्ञा एस. काळे यांनी दिला आहे.

तालुक्यातील कोक्ता येथील आत्माराम डोलारे व त्यांची पत्नी गजाबाई डोलारे हे दोघे १४ ऑगस्ट २०१७ रोजी गावानजीक असलेल्या ड्रीमलॅन्ड सिटीमध्ये बकऱ्या चारण्यासाठी गेले होते. यावेळी गावातीलच वासुदेव पांडुरंग सावरकर याने त्याच्या पडीक शेतात बकरी गेली म्हणून त्यांच्यासोबत वाद घालीत पती पत्नींना मारहाण केली. प्रकरणी तक्रारीवरून जलंब पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते.

त्यानंतर १९ ऑगस्ट २०१७ रोजी गजाबाई डोलारे ही महिला गावाशेजारी बकऱ्या चारत असताना दुपारी दोन वाजताच्या सुमारास वासुदेव पांडुरंग सावरकर, पांडुरंग उकर्डा सावरकर, महादेव पांडुरंग सावरकर हे तिघे गजाबाई जवळ गेले. यातील पांडुरंग सावरकर व महादेव सावरकर या दोघांनी गजाबाईचे हात धरले. तर वासुदेव सावरकर याने हातातील कुऱ्हाडीने गजाबाईच्या मानेवर व पाठीवर वार करून तीचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर घटनास्थळावरून तिघेही पळून गेले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. परंतु तोपर्यँत गजाबाईचा जागीच मृत्यू झाला होता.

याबाबत अनिल आत्माराम डोलारे यांनी जलंब पोलिसांत उपरोक्त तीन जणांविरुद्ध खुनाची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून जलंब पोलिसांनी तिनही आरोपी विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. या घटनेचा तपास एपीआय एस. आर. निचळ यांनी करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. दरम्यान, आज १३ मे रोजी येथील न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी करण्यात आली. सरकारी पक्षाच्या वतीने बारा साक्षीदार तपासण्यात आले.

या प्रकरणात विनोद धनोकार, कैलास झनके, सहदेव कळस्कार, गणेश ताठे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. साक्षीदारांची साक्ष व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता रजनी बावस्कर-भालेराव यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने वासुदेव सावरकर, पांडुरंग सावरकर, महादेव सावरकर या तिघांना कलम ३०२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येकी २० हजार रुपये दंडही ठोठावला आहे. दंड जमा केल्यास दंडातील ५० हजार रुपये रक्कम तक्रारकर्त्यास नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच दंड न भरल्यास आणखी दोन वर्षांचा सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. असेही न्यायालयाने निकालात नमूद केले आहे. कोर्ट पैरवी म्हणून पीएसआय बेग तर कोर्ट मोहरर म्हणून महिला पोलिस कर्मचारी चित्रलेखा शिंदे यांचे सहकार्य मिळाले.

बातम्या आणखी आहेत...