आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरणवादी व समाजसेवक:बारा वर्षाच्या तपातून शिक्षक अनंत शेळकेंनी वंचित मुलांचे घडवले संचित

हिवरा आश्रम / शिवप्रसाद थुट्टेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मी दगडांची पूजा करत नाही, माणसांची आरती गातो.. ज्यांच्या घरात उजेड नाही, त्यांच्या हाती सूर्य देतो..! या ओळींचे आशय कृतीत उतरवत गेल्या १२ वर्षांत वंचित मुलांचे संचित घडवण्याचे अलौकिक कार्य मेहकर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जि. प. शाळेचे शिक्षक अनंत शेळके अविरतपणे करत आहेत. हिवरा आश्रम येथे नित्यानंद प्रकल्पाची स्थापना केली. त्या प्रकल्पात आज ५० विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.

हिवरा आश्रम परिसरात अनंत शेळके हे उपक्रमशील शिक्षक, पर्यावरणवादी व समाजसेवक म्हणून ओळखले जातात. २००१ मध्ये माळखेड येथे प्राथमिक शिक्षक म्हणून ते रुजू झाले. त्यानंतर कासारखेड येथे व पुन्हा माळखेड येथे त्यांची बदली झाली. जि. प. शाळेत प्रगत शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत १०० टक्के शाळा प्रगत, शिष्यवृत्ती, नवोदय व इंग्रजी अध्ययन पूरक उपक्रम राबवत आहेत. तर नियतीच्या आघाताने झालेले वंचित व अनाथ मुलांना आपल्या मायेच्या पंखाखाली घेत, स्वतःच्या कमाईतील राशी खर्च करत त्यांच्यासाठी हक्काचे घर अनंत शेळके यांनी उभे केले. तेही शासनाची कुठलीही दमडी न घेता. नित्यानंद सेवा प्रकल्प असे या घराचे नाव असून, दर्जेदार शिक्षणासोबतच निवास, भोजन, शिकवणी, संगीत, कला, क्रीडा व शैक्षणिक सुविधा वर्षानुवर्ष नि:शुल्क पुरवत आहेत. शुकदास महाराज व स्वामी विवेकानंद त्यांचे आदर्श आहेत. त्यांनी सुरू केलेल्या सेवा कार्यात माजी विद्यार्थी व शिक्षक, समाजातील दानशूर व्यक्ती फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करत आहेत. या दरम्यान अनेक संकटांचा सामना शेळके यांना करावा लागला. प्राथमिक शिक्षक म्हणून काम करताना शेळकेंना अनाथ विद्यार्थ्यांचे दुःख दिसले.

या मुलांचे पालकत्व स्वीकारण्याचा मनोमन विचार केला व तो कृतीत उतरवला.सुरुवातीला नित्यानंद सेवा प्रकल्पात केवळ पाच मुले होती. २००९ मध्ये भाड्याच्या खोलीत त्यांनी हा उपक्रम राबवला. आज ही संख्या ५० च्या घरात पोहोचली आहे. या अनाथ मुलांना हक्काचे घर मिळाल्याने ते गुण्यागोविंदाने शिक्षण घेत आहेत. भविष्यात या मुलांसाठी डिजिटल अभ्यासिका, स्वतंत्र स्नानगृह, संगणक लॅब, तिसऱ्या मजल्याचे बांधकाम, डायनिंग हॉल, हेल्थ क्लब, संगीत कक्ष, डिजिटल क्लास रूम इत्यादी महत्वाकांक्षी उपक्रम राबवण्याचा मानस शिक्षक अनंत शेळके यांनी व्यक्त केला आहे. जि. प.ने नुकतेच आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केले. कोणत्याही कामाचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन अत्यंत महत्वाचे असते, पण तसे होतांना बरेचदा दिसत नाही. खरे शिक्षक पुरस्कारापासून वंचितच राहतात. वंचितांचे संचित घडवणारे शिक्षक पुरस्कारापासून वंचित हा समाजमनाने उपस्थित केलेला प्रश्न मात्र मन सुन्न करणारा आहे.नित्यानंद परिवार हेच माझे घर : अडीच वर्षांचा असताना अनाथ झाल्यामुळे मला या नित्यानंद परिवाराने माया दिली. आज नित्यानंद परिवार हेच माझे घर झाले आहे, असे मत माळखेड येथील कार्तिक लंबे या विद्यार्थ्याने व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...