आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजेवणात अत्यावश्यक असलेला कांदा, टोमॅटो तर कधी बटाटा शेतकऱ्यांना व नागरिकांना रडवतो. या पदार्थांचे भाव कधी वाढतील अन् कधी कोसळतील याविषयी काहीच सांगता येत नाही. नुकतेच कांद्याचे भाव गडगडलेले बघितले आहेत. आता मात्र किचनमध्ये आवश्यक असलेल्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहे. जे टोमॅटो कधी रस्त्यावर फेकून दिले जात होते. कमी उत्पादनामुळे टोमॅटोचे भाव वाढले असतील अशी चर्चा सुरु आहे. जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात २९२ हेक्टर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड करण्यात आली होती. त्यामध्ये पाच हजार २१२ मेट्रिक टन टोमॅटोचे उत्पादन झाले. सरासरी एकरी १२ टन हे उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात सात लाख हेक्टर हे लागवडीखालील आहे. पावसाच्या आगमनावर बहुतांश पेरण्या होतात किंवा काही हेक्टर जमीन बिना लागवडीची ठेवले जाते. या खरीप हंगामात इतर पिकांसोबत टोमॅटोचे पीकही घेतले जाते. दरम्यान, या काळात टोमॅटोचे उत्पादन मोठया प्रमाणात होत आले आहे व टोमॅटोचे भाव पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याचे आंदोलन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. यावेळी कांद्यानेही शेतकऱ्यांच्या डोळयात पाणी आणले होते. परंतु, टोमॅटोने थोडे का होईना पण, आनंदाचे अश्रु आणले. बाजारात पोहोचेपर्यंत हा टोमॅटो व्यापाऱ्यांनी महाग केला. शेतकऱ्यांनी टोमॅटोचे भाव कॅरेट मागे कमी द्यायचे व शेतकऱ्याला लुबाडण्याचा व्यवसाय अजूनही सुरुच आहे. स्वत:चे रक्त आटवून हे टोमॅटो शेतकऱ्यांनी भर उन्हात काळजी घेऊन उगवले. त्याला कॅरेट मागे मात्र काही तरी भाव देऊन टोमॅटोचे भाव वाढवून व्यापारी मात्र लालेलाल झाले आहेत. यावेळी सर्वसामान्य नागरिक मात्र बाजारात टोमॅटो हात आवरुनच घेत आहेत. कारण जास्त दिवस झाले की टोमॅटोही खराबच होत आहे. त्यामुळे भाजीतून टोमॅटो गायब झाले आहेत. दोन हजार रुपयांचे १५ किलो रुपयांचे कॅरेट सध्या मिळत आहे.
सध्या बाजारात नाशिकचा टोमॅटो ^जिल्ह्यात टोमॅटोचे कमी उत्पादन झाल्यामुळे बाजारात टमाटरची आवक नाही. पश्चिम महाराष्ट्रातून सध्या जिल्ह्यात टमाटर विक्रीस येत आहेत. एक कॅरेट १५ किलोचे असते. ते दोन हजार रुपयांचे मिळते. त्यामुळे ते बुलडाण्यात भाजी विक्रेत्यांना १०० रुपये किलोने मिळते. ग्राहकांना १२० रुपये दराने ते विक्री करावी लागते. -हरीभाऊ जाधव, भाजी विक्रेता कोलवड तालुका बुलडाणा
शेतकऱ्यांना भाव मिळणे योग्य शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळून त्याच्या कष्टाला फळ मिळेल. एरव्ही त्याच्या कोणत्याच उत्पादनाला भाव मिळत नाही. टोमॅटोला योग्य भाव मिळत असेल तर ते चांगलेच आहे. पण, व्यापारी त्याची लुबाडणूक करुन लोकांना वेठीस धरत असतील तर ते चूकच आहे. -चक्रधर लांडे, जिल्हा सरचिटणीस भारतीय किसान मोर्चा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.