आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त यंदा हर घर तिरंगा मोहीम राबवली जाणार आहे. या अनुषंगाने पंचायत समितीच्या वतीने जोरदार तयारी सुरू आहे. या मोहिमेत तालुक्यातील ९७ ग्रामपंचायत अंतर्गत १३२ गावात सुमारे ४० हजार घरावर तिरंगा ध्वज फडकणार आहे. ग्रामपंचायतकडून अत्यल्प दरात ध्वजांची खरेदी करून नागरिकांना आपापल्या घरांवर ध्वज लावण्यासाठी दिले जाणार आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासनाच्या वतीने हर घर तिरंगा व स्वराज्य महोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अभियानाची अंमलबजावणी करण्याचे काम विविध विभागांसह पंचायत समितीकडे सोपवण्यात आले असून ग्रामस्तरावर ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत विवीध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यामध्ये ८ ऑगस्ट रोजी विशेष ग्रामसभा, ९ ऑगस्ट रोजी समुह राष्ट्रगान होणार असून सर्व शाळांमधून सकाळी ११ वाजता एकाच वेळी राष्ट्रगीत गायन होईल. सडा रांगोळी, घराला तोरण, प्रभात फेरी, स्वातंत्र्य सैनिकांचे मार्गदर्शन होणार आहे. १० ऑगस्ट रोजी स्वच्छता मोहिम, महिला मेळावे तर ११ ऑगस्ट रोजी महिला बचत गट मार्गदर्शन, गावाचा व राष्ट्राचा इतिहास सांगितला जाणार आहे.
१२ ऑगस्ट रोजी मोबाईल दुष्परिणाम मार्गदर्शन चर्चा, अर्थ साक्षरता विषयक शिबिर होणार आहे. १३ ऑगस्ट रोजी गोपाळांची पंगत, सेंद्रिय शेती मार्गदर्शन, शेतकरी मेळावे मार्गदर्शन, प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज उभारणे, १४ ऑगस्ट रोजी पर्यावरण संवर्धन शपथ, वृक्षारोपण करण्यात येणार आहे.१५ ऑगस्ट रोजी प्रभात फेरी, शालेय स्पर्धा, १६ ऑगस्ट रोजी किशोरी मेळावे, सांस्कृतिक ,प्रबोधन व देशभक्तीपर कार्यक्रम तसेच स्वराज्य फेरी तर १७ ऑगस्टला स्वराज्य महोत्सव सांगता समारोह, स्वराज्य फेरी, देशभक्तीपर चित्रपट दाखवणे आदी कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येक गावाकरिता शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून ५० ते १०० घरामागे एक स्थानिक कर्मचारी लक्ष ठेवून राहणार असल्याची माहिती पंचायत समिती विभागाने दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.