आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टीसह संततधार पाऊस:चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हातावर तुरी

मेरा खुर्दएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यावर्षी अतिवृष्टीसह संततधार पाऊस झाल्याने कापसासह सोयाबीन पीकही शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. मात्र, तूर चांगली येईल अशी आशा असतानाच त्यावर किडीचा प्रादुर्भाव झाल्याने चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा संकट उभे ठाकले आहे. उत्पादनात घट झाल्याने लागवडीसाठी झालेला खर्च कसा फेडायचा तसेच बँकांच्या कर्जाची परतफेड कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांचे पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकांंचे या खरीप हंगामात नुकसान झाले. त्यानंतरही पावसाचा कहर चालूच होता. निसर्गाच्या लहरीपणाचा सातत्याने अनुभव येत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी ही पीक विमा काढला होता. मात्र, विमा कंपनीने वाऱ्यावर सोडल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. खरिपातील सर्वच पिकांना यंदा पेरणीपासूनच धोका होता. तो खरा ठरल्याने उडीद, मू्ग, सोयाबीन, कापूस अशी पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांची मदार तुरीच्या पिकावर होती. मात्र, पीकही संकटात सापडले आहे.

तालुक्यात यंदा तूर पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणावर राहिला. आता अंतिम टप्प्यात आलेल्या तुरीलाही अवकाळी पावसासोबत ढगाळ वातावरणाचा फटका बसला आहे. औषधी फवारणी करूनही नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांकडे इतर पर्याय उरला नसल्याचे दिसत आहे. मध्यंतरीच्या अतिवृष्टीमुळे २५ ते ३० टक्के कृषी क्षेत्रावरील तूर पिकाचे नुकसान झाले.

त्यातील काही तूर पिकावर परिणाम झाला नव्हता. त्यामुळे हे पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. मात्र, आता रोगाचे वाढते प्रमाण आणि ढगाळ वातावरण याचा थेट परिणाम उत्पादनावर होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वी ढगाळ आणि धुक्याच्या वातावरणामुळे तुरीवर दवाळ रोगाचे सावट आले आहे. वातावरणातील बदलामुळे तालुक्यातील हजारो हेक्टरवरील तुरी करपल्या आहेत. आधी सोयाबीन, नंतर कपाशी आणि आता तुरीमुळे शेतकऱ्यांच्या समोरील संकटाची मालिका थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सरकारने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

तुरीचे उत्पादन कमी होणार
हलक्या जमिनीवरील तूर सोंगण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, उत्पादन कमी होणार असल्याची शक्यता वाटत आहे. - अमोल सुर्वे,शेतकरी, असोला

आणखी पंधरा दिवस लागेल
काळी जमीन तसेच पाण्याची सुविधा असणाऱ्या जमिनीवर तुरीला आणखी पंधरा दिवस लागणार आहेत.- कैलास परिहार, शेतकरी, अंचरवाडी

बातम्या आणखी आहेत...