आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्थांमध्ये संताप:बोलेरो-दुचाकीच्या अपघातात चोवीस वर्षीय युवक ठार; दोन दिवसांत दोन अपघात

डोणगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव जाणाऱ्या बोलेरोची व दुचाकीची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात चोवीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना येथून जवळच असलेल्या औरंगाबाद-नागपूर राज्य महामार्गावरील हॉटेल रामशक्ती जवळ १० मे रोजी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास घडली. किशोर किसन काळे असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अवघ्या दोन दिवसांत अपघाताच्या दोन घटना घडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मालेगाववरुन एम.एच. ३७ / ए/ ३३३५ या क्रमांकाची बोलेरो मेहकरकडे येत होती. तर नागापूरहून एम.एच. ३० / बी.एम. १८५७ या क्रमांकाची दुचाकी डोणगावकडे येत होती. औरंगाबाद-नागपूर महामार्गावरील हॉटेल रामशक्ती जवळ येताच दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार किशोर किसन काळे रा डोणगाव वय २४ हा युवक गंभीर जखमी झाला. अपघात घडताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून त्याला उपचारासाठी तातडीने मेहकर येथे हलवण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले हा अपघात हा एवढा भीषण होता की, या अपघातात दुचाकी पूर्णता क्षतिग्रस्त झाली होती.

किशोरचे अपघाती निधन झाल्यामुळे डोणगावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अपघातानंतर पोलिसांनी बोलेरोच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे ९ मे च्या दुपारी सुद्धा दुचाकी व कारचा अपघात झाला होता या अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला होता. या घटनेची शाई वाळत नाही तोच १० मे च्या रात्री त्याच ठिकाणी अपघात होऊन एक युवक ठार झाला. राज्य महामार्गावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत.

बातम्या आणखी आहेत...