आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्नितांडव:गोठ्याला लागलेल्या आगीत दोन गायींचा होरपळून मृत्यू; 4 क्विंटल कांद्याच्या बीजासह 20 पोते सोयाबीनही जळाले

अंढेरा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोठ्यांच्या पत्रावर टाकलेल्या कडब्याला अचानक आग लागल्याने या आगीत गोठा जळून खाक झाला आहे. तर त्याच गोठ्यातील दुचाकीने पेट घेऊन पेट्रोल टाकीचा स्फोट झाल्याने शेजारील गोठाही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या घटनेत दोन गाईचा होरपळून मृत्यू झाला. तसेच कांदा बियाणे, सोयाबीनचे पोते आणि शेतीउपयोगी साहित्य जळून लाखोंचे नुकसान झाले आहे. ही घटना अंत्री खेडेकर येथे शुक्रवारी सकाळी घडली आहे.

अंत्री खेडेकर येथील शेतकरी प्रकाश चंद्रभान पडघान आणि दतात्रय पडघान या दोन्ही शेतकऱ्यांनी गावाला लागून असलेल्या शेतात टीनपत्र्यांचे गोठे बांधले होते. तापमान जास्त असल्याने गोठ्यात थंडावा राहावा, यासाठी शेतकऱ्यांनी टीन पत्र्यांवर कडबा टाकून ठेवला होता. दरम्यान शुक्रवारी सकाळी गोठ्यांवरील चाऱ्याने अचानक पेट घेतला.

त्यामुळे गोठ्याला आग लागली. यावेळी गोठ्यातील दुचाकीचा स्फोट होताच शेजारील गोठाही आगीत पेटल्यामुळे गोठ्यात बांधलेल्या दोन गाईचा होरपळून मृत्यू झाला. तसेच कांद्याचे चार क्विंटल बियाणे, २८ पोती सोयाबीन व शेतीउपयोगी साहित्य जळून खाक झाले. या घटनेत दोन्ही शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच तलाठी गाडेकर पोलिस कर्मचारी, मंडळ अधिकारी पशू वैद्यकीय अधिकारी मोरे यांनी पंचनामा केला. यावेळी संजय खेडेकर, गजानन खेडेकर, अमोल खेडेकर, नारायण खेडके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...