आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

जीवावर बेतला धोंडा:दोन बहिणींच्या जीवावर बेतली धोंड्याची आंघोळ, खामगाव येथे नदीत बुडून अंत

औराळा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड तालुक्यातील खामगाव येथील कैलास जगन्नाथ कवडे, शिवाजी जगन्नाथ कवडे या दोन सख्या भावाच्या आरती कैलास कवडे (19) ऋतुजा शिवाजी कवडे (16) या दोन सख्ख्या चुलत बहिणीचा नदीत बुडून मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी सकाळी सात वाजता घडली.

याबाबत नातेवाइकांनी दिलेली माहिती अशी की, अधिक मास (धोंड्याचा महिना) चालु असल्याने या महिन्यात एकादशी दिवशी नदी, तळ्यावर आंघोळ केल्याने पुण्य मिळते या भावनेने मंगळवारी आरती, ऋतुजा आपल्या आजीसोबत धोंड्याची आंघोळ करण्यासाठी खामगाव जवळील नदीच्या कडेला असलेल्या महादेव मंदिराच्या बेटावर गेल्या होत्या. आंघोळ करत असताना लहान बहीण ऋतुजा अचानक तोल गेल्याने पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी आरती पुढे गेली, मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ती देखील पाण्यात बुडली. दोघी नातीला वाचवण्यासाठी 65 वर्षीय आजीने भरपूर आरडाओरडा केला. मदतीसाठी नागरिक येईपर्यंत आजी देखील पाण्यात उतरली, परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने आजीने पाण्यात दोन गटांगळ्या खाल्ल्या. आजीच्या आवाजाने जवळ असलेल्या मध्यप्रदेशातील मजुरांनी व अप्पासाहेब गायके या तरुणाने मोठ्या हिंमतीने आजीला कसेबसे बाहेर काढले. परंतु आरती, ऋतुजाला दुर्दैवाने वाचवू शकले नाही. या घटनेने गावासह परिसरात हळहळ व्यक्त होते आहे. ग्रामस्थांनी या दोन्ही बहिणीचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी औराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप कांबळे यांनी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. बिट जमादार आव्हाळे, धुमाळ यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद केली.