आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक उन्नती:तीन हजार लोकसंख्येच्या बोरजवळातून दररोज होते दोन हजार लिटर दूध संकलन; दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधार, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत

खामगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतीसोबतच जोडव्यवसाय पशुपालन करून चांगले उत्पन्न मिळवता येते. तालुक्यातील बोरजवळा या गावाची तीन हजार लोकसंख्या असून या गावात गाई-म्हशीचे पालन करुन शेतकरी दररोज दोन हजार लिटर दूध संकलन करत आहे. यामुळे शेतकऱ्यांना जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे. दुग्ध व्यवसायातून गावात लाखोंची उलाढाल होत असल्याने पशुपालन हा शेतीला आधार ठरत आहे.

तालुक्यातील बोरजवळा या गावातील शेतकऱ्यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय असून सिंचनासाठी पाण्याची पुरेशी सोय असल्याने या भागातील शेतकरी खरीप, रब्बी, उन्हाळी हंगामासोबतच केळीचे उत्पन्नही घेतो. मात्र निसर्गाच्या अवकृपेने गेल्या काही वर्षांत शेती बेभरवशाची झाली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायाला प्राधान्य दिले. पशुपालन करून दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे.

दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरित गाई, म्हशी पाळल्या जात असताना पारंपरिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत उत्पन्न मिळते. गावामध्ये सद्यस्थितीत ४०० ते ४५० गायी तर ८० ते १०० दरम्यान म्हशींची संख्या आहे. संपूर्ण गावातून दररोज सकाळ - संध्याकाळी गाईंचे १८०० लिटर पेक्षा जास्त तर १५० ते २०० लिटर पर्यंत म्हशींचे दूध संकलन केले जात आहे.

दुधाचा दर ३२ रुपये लिटर मिळत असून गावातच मदर डेअरी शासकीय दूध संकलन केंद्र तर भरुच व अमर ही दोन खासगी केंद्र आहेत. येथून मलकापूर तसेच खान्देशातील बोदवड, सावदा फैजपूर येथे दूध विक्री केली जाते. दर आठवड्याला पाच ते साडे पाच लाखाची उलाढाल होत असताना दूध विक्रीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. हॉस्टेन, एचएफ व जर्सी जातीच्या गाई तर मुऱ्हा, मैसाना जातीच्या म्हशी असून या जनावरांसाठी मका, सोयाबीन, तुरीचे, गव्हाचे कुटार, कडबा कुट्टी पशुखाद्य व गवत याचा चाऱ्यासाठी उपयोग केला जातो. कुटुंबातील सर्वजण या व्यवसायात कष्ट करीत आहेत. शेणखताचा उपयोग शेतातील पिकांना शेणखताचा उपयोग होतो.

तर उर्वरित खताची विक्री केली जाते. खताला बाजारभाव ही चांगला मिळतो. खत विक्रीतून बऱ्यापैकी उत्पन्न मिळते. त्यामुळे कुटुंबाची प्रगती होण्यास चांगला हातभार लागत आहे. सातत्यपूर्ण कामातून बोरजवळा गावाने तालुक्यात दुग्ध व्यवसायातून वेगळा ठसा निर्माण केला आहे.

बातम्या आणखी आहेत...