आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभरधाव ट्रकने प्रथम सायकलस्वार त्यानंतर दुभाजकावरील विद्युत खांब आणि गॅस सिलिंडरच्या ट्रकला धडक दिली. त्यानंतर अनियंत्रित झालेला ट्रक खामगाव-नांदुरा रस्त्यावरील एका हॉटेल समोर उलटला. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये ट्रकचालकासह एक जण जखमी झाला .
खामगाव-नांदुरा रस्त्यावरुन एम.एच.४० ए.के.४४४७ क्रमांकाचा ट्रक नांदुऱ्याकडे राख घेऊन जात होता. जलंब नाक्यासमोर या ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने सुरूवातीला सुटाळा येथील राजू जानकीराम बगाडे या सायकल स्वारास धडक दिली. त्यानंतर दुभाजकावरील विद्युत खांबास धडक दिली. त्यानंतर एम.एच. ३७ टी. ०२७१ या सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या एका बाजूला धडक देत, रस्त्यावर उलटला. या अपघातामुळे खामगाव-नांदुरा रस्त्यावर एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघातग्रस्त ट्रकमधील चालकाला बाहेर काढले. तात्काळ खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविले. ज्ञानेश्वर मुकींदा अंमलकार (४२) रा. काळेगाव ता.खामगाव असे जखमी चालकाचे नाव असून वाहक अवदेश प्रताप (३४) रा.उत्तरप्रदेश हा किरकोळ जखमी झाला आहे. त्याचवेळी जखमी सायकल स्वाराला एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात अाले. ट्रकने धडक दिल्याने सिलिंडरच्या ट्रक मधील सिलिंडरमधून गॅस गळती सुरू झाली. शहर पोलिस त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. क्षणाचाही विलंब न लावता सिलिंडरच्या ट्रकला सुरक्षित ठिकाणी हलविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला . या घटनेमुळे खामगाव-नांदुरा रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.