आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लोणार येथील धारातीर्थ परिसराची पाहणी केली. धारातीर्थ येथील सतत वाहणारी धार, परीसरात असलेली वृक्षवल्ली, वन्यजीव आदींची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली. माहिती घेत असतानाच परीसर विकासाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सुचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री डॉ. संजय रायमूलकर, संजय गायकवाड, माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, उपविभागीय अधिकारी गणेश राठोड, बुलडाणा कृउबासचे सभापती जालींधर बुधवत आदींसह पुरातत्व विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सरोवरासोबत सेल्फी सुद्धा घेतला. तसेच उपस्थितांसोबत सरोवराचे छायाचित्रणही केले.
धारातीर्थ परीसराच्या विकासाबाबत सुचना देत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, परीसरातील जमिनीचे सपाटीकरण करून लँण्डस्केप विकसित करावे. अतिशय मानव निर्मित वाटू नये याची काळजी घेत त्याला नैसर्गिक टच ठेवावा. सौंदर्यीकरण करून शोभेची झाडे लावण्यात यावीत. परीसराच्या विकासासाठी काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे. धारातीर्थ परीसराची पाहणी करुन मुख्यमंत्र्यांनी गावातील दैत्यसुदन मंदिराला भेट दिली. दैत्यसुदन मंदीरात आत जात मुख्यमंत्र्यांनी येथील ऐतिहासिक शिल्पाविषयी माहिती घेतली. दैत्यसुदन मंदिरातील कोरीव कामाची पाहणीही त्यांनी केली. याठिकाणी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांसोबत छायाचित्रण केले. कोरीव कामांचे मोबाईलमध्ये छायाचित्र काढले. यावेळी लोणार सरोवराचे अभ्यासक स्व. सुधाकर बुगदाने यांच्या स्नुषा शैलेजा श्रीपाद बुगदाने व शुभदा स्वप्नील बुगदाने यांनी स्व. सुधाकर बुगदाने लिखीत लोणार सरोवर हे पुस्तक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेट दिले.
असा आहे ‘लोणार संवर्धन व विकास आराखडा’
लोणार सरोवर संवर्धन व जतन करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ९१ कोटी २९ लाख रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. त्यात प्रयोगशाळा व पर्यटक माहिती केंद्र, तारांगण व संग्रहालय, दुर्गा टेकडी परिसरात रस्ते,सांडपाणी, वाहनतळ व सुशोभिकरण, सरोवराजवळील सुरक्षा कक्ष, निरीक्षण तळ, प्रदूषण विरहित बसेस आदी कामे तसेच सरोवर परिसरातील पुरातन मंदिरांचे संवर्धन, शासकीय इमारतींचे नूतनीकरण, दुर्गा टेकडी येथे पर्यटक निवास बांधणे प्रस्तावित आहेत. याशिवाय ६१ कोटी रूपयांचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नगर परिषद लोणार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत राबविण्यात येणार आहे. तसेच ३ कोटी ६३ लाख रुपये खर्चून पिसाळ बाभूळ निष्कासन प्रकल्प विभागीय वनाधिकारी वन्यजीव अकोला या यंत्रणेमार्फत राबविण्यात येईल. ५४ हेक्टर क्षेत्रावर हे काम करण्यात येईल. तसेच परिसराच्या विकासासाठी आवश्यक खाजगी जमीन संपादनासाठीही १५ कोटी रुपये निधी मागणीचा प्रस्ताव आहे. एकूण लोणार सरोवर परिसराचा विकास करण्यासाठी २०५ कोटी १२ लक्ष रुपयांचा विकास आराखडा करण्यात आला असून त्यातून मंजुरी मिळालेल्या व निधी प्राप्त झालेले साडेसात कोटी रुपयांची कामे पूर्ण ही झाली आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.