आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतजमिनीचा ताबा आणि वहिवाटीबाबत शेतकऱ्यातील आपसातील वाद मिटवण्यासाठी सलोखा योजना उपयुक्त ठरणार आहे. परस्परांमधील शेतजमिनीचा ताबा परत मुळ मालकाकडे करण्यासाठी आता सलोखा योजनेतून नाममात्र एक हजार रूपयांत दस्त नोंदणी होणार आहे. अशी माहिती महसूल विभागाने दिली आहे. शेतजमिनीच्या वहिवाटीवरून होणारे वाद वाढत आहे. यावर उपाययोजना म्हणून हे वाद मिटवणे आणि समाजात सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी ही योजना प्रभावी ठरणार आहे.
यामुळे एकमेकांमधील सौख्य आणि सौहार्द वाढीस लागण्यासाठी एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे किंवा दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमिनधारकांचे अदलाबदल दस्तांसाठी नोंदणी शुल्क एक हजार रूपये नाममात्र आकारण्याबाबत सवलत देण्याची सलोखा योजना ३ जानेवारी २०२३ पासून राबवण्यात येत आहे. सदर योजना अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून दोन वर्षांपर्यंत लागू राहणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन्ही शेतकऱ्यांचा एकमेकांच्या जमिनीवरील ताबा किमान १२ वर्षांपासून असणे आवश्यक आहे. एकाच गावात जमिन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांचे परस्परांकडे मालकी आणि ताबा असल्याबाबतचा पंचनामा मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी करुन दस्त नोंदणीच्या वेळी दस्तासोबत जोडणे बंधनकारक आहे.
या योजनेमुळे सकारात्मक मानसिकता होऊन जमिनीच्या विकासाला चालना मिळणार आहे. तसेच शेतकऱ्याचे वैयक्तिक आणि राष्ट्रीय उत्पादनात वाढ होऊन न्यायालयांमध्ये प्रलंबित दावे निकाली निघून शेतकरी, न्यायालय आणि प्रशासनाचा वेळ आणि खर्च वाचणार आहे. सलोखा योजना ही शेतकऱ्यांच्या हिताची असल्यामुळे योजनेचे निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन वाद मिटवून सामाजिक सौख्य आणि सौहार्द वाढवण्यास हातभार लावावा, योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.