आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामात हलगर्जी:नाल्या तुंबल्यामुळे पाणी रस्त्यावर; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

बुलडाणा2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिल्याच पावसाने लावली नगर पालिकेच्या साफसफाईची वाट

मागील काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात पावसाळ्याला सुरूवात झाली असून दोन दिवसांपूर्वी शहरात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे या पहिल्याच पावसाने पालिकेच्या साफसफाईची वाट लावली आहे. पहिल्याच पावसात नाल्या तुंबल्यामुळे पाणी रस्त्यावर साचले आहे. या पाण्याची दुर्घंदी सुटत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.

दरवर्षी पावसाळा सुरू होण्याअगोदर पालिका प्रशासनाकडून शहरात मान्सूनपूर्व साफसफाई करण्यात येते. त्यामध्ये नालीतील कचरा काढणे, तुंबलेल्या पाण्याची विल्हेवाट लावणे, साचलेले कचऱ्याचे ढिग उचलने, यासह इतर कामे पावसाळ्यापूर्वी करण्यात येतात. परंतु यंदा शहरातील रस्त्यावर पसरलेले कचऱ्याचे साम्राज्य, कचरा साचल्यामुळे तुंबलेल्या नाल्या पाहता पालिका प्रशासनाला मान्सूनपूर्व साफसफाईचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे सध्या स्थितीत शहराच्या बहुतांश भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शहरातील अनेक चौकातील नालीत कचरा अडकला आहे. या कचऱ्यामुळे नालीतील घाण पाणी सरळ वाहून न जाता ते रस्त्यावरून वाहत जात आहे. त्यामुळे रस्त्यावर घाण पाण्याचे डबके साचले आहेत. या घाण पाण्याची सर्वत्र दुर्गंधी सुटत असल्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. वास्तविक पाहता बुलडाणा शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे येथील विविध कार्यालयात दररोज कामासाठी जिल्हाभरातून नागरिक येत असतात. परंतु या घाण पाण्याचा त्रास त्यांना देखील सहन करावा लागत आहे. नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी शहराची साफसफाई करून तुंबलेल्या नाल्यातील कचरा काढण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

शहरातील जयस्तंभ चौकात पाण्याचा तलाव
शहरातील मुख्य व अत्यंत वर्दळीचा समजल्या जाणाऱ्या जयस्तंभ चौक परिसरातील पावसाचे पाणी वाहुन जात नसल्यामुळे दरवर्षी या चौकात पाण्याचा तलाव साचत आहे. तर या चौका समोरच ठिकठिकाणी घाण पाण्याचे डबके साचत असून त्यामुळे या चौकातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

कचरा व पाण्याची विल्हेवाट लावण्यात यावी
पहिल्याच पावसात ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचा नागरिकांना त्रास होत आहे. शिवाय रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अपघातास निमंत्रण देणारे खड्डे बुजवून रस्त्यावर साचलेले घाण पाणी व कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यावी.
-गणेश भोसले, सामाजिक कार्यकर्ता

बातम्या आणखी आहेत...