आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा शहरात आपला पारंपरिक व्यसायासोबत मिळेल ती मोलमजुरी करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका ४२ वर्षीय पित्याने आपल्या मुलींच्या जन्माचे डीजे लाऊन वाजत गाजत स्वागत करून समाजासमोर एका आदर्श निर्माण केला आहे.
एकीकडे संपूर्ण राज्यात दररोज कोणत्या ना कोणत्या ठिकाणी महिलांच्या मातृत्वाचा आणि कर्तृत्वाचा गौरव करण्यात येत असताना कन्येने जगात पाऊल ठेवले आणि तिच्या पित्याला एवढा आनंद झाला की त्याने रुग्णालयातून बाळ आणि बाळंतिणीला सुटी मिळताच डीजेच्या गजरात आनंद साजरा केला. देशभरात स्त्री भ्रूण हत्यांचे प्रमाण गाजत असतानाच श्रीनाथ दांपत्याने मुलीच्या जन्माचे स्वागत वाजत गाजत केले एवढेच नव्हे तर वडील विजय श्रीनाथ यांनी रुग्णालय परिसरात पेढे वाटून लेकीच्या जन्माचा आनंद साजरा केला.
मोताळा येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ तेजल काळे यांच्या प्रथमेश सर्जिकल हॉस्पिटलमध्ये सकाळी नऊ वाजेच्या सुमारास चिमुकलीचा जन्म झाला. बेचाळीस वर्षीय असलेल्या विजय श्रीनाथ व पत्नी प्रतिभा विजय श्रीनाथ यांना ओम वय १२ व श्रीकांत वय १० अशी दोन मुले आहेत. परंतु मुलींची माया ही जगावेगळी असल्याने मुलींची उणीव मुले कधीच भरू काढू शकत नसल्याने आपल्याला सुद्धा मुलगी असायला पाहिजे, अशी त्यांची मनोमन इच्छा होती योगायोगाने ती पुर्ण सुद्धा झाल्याचे वडील विजय श्रीनाथ यांनी सांगितले.
जातीने भोई समाज असलेले विजय श्रीनाथ हे आपला पारंपरिक व्यवसायासह मिळेल ती मोलमजुरी करीत कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. या परिस्थीतीतही त्यांनी घरासमोर डिजे लावुन मुलींच्या जन्माचे स्वागत केले आहे. एकीकडे दिल्ली पासुन ते गांव-खेड्या पर्यत स्त्री भ्रूण हत्यांचे प्रमाण वाढत असतानाच श्रीनाथ दाम्पत्याने मुलीच्या जन्माचे केलेले स्वागत म्हणजे स्त्री भ्रूणहत्या करणाऱ्याच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.